शहरातील गॅस चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी 

मुंबई नाका भागात भरलेल्या घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरी करण्याचे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारावाईत 32 सिलिंडर, चारचाकी टेम्पोसह लोखंडी पाईप आणि वजनकाटा असा सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहरात गॅस चोरीची अनेक केंद्रे कार्यान्वित असल्याचे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

घरगुती गॅसमधून थेट वाहनात गॅस भरण्याचा धोकादायक प्रकारही खुलेआम सुरू असल्याचे यामुळे समोर आले असून गॅस सिलिंडर वितरणाचा प्रश्न चर्चेत आला आहे.

मुकेश रामभाऊ पाथरे (रा. कमलवाडी, निमसे मळा) व राकेश सुभाष सोनवणे (रा. विद्यानगर, मखमलाबाद रोड) अशी सिलिंडरमधून गॅस चोरी करताना पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

हा अड्डा कमलवाडी येथील काशिनाथ निमसे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता. नांदूर नाका भागात घरगुती सिलिंडरमधून परस्पर गॅस चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि आडगाव पोलीस यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा टाकला असता पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे गॅस चोरी होत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच गॅस चोरी करणारे भामटे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शेडमधून एमएच 15 बीजे 3821 या वाहनासह सुमारे 2 लाख 97 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*