डॉक्टरांच्या हलगर्जीने आई-मुलीची ताटातूट

0

नवीन नाशिक । दि. 27 प्रतिनिधी
जबाबदार वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, चुकीची उपचार पद्धती आणि रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आपल्या पत्नीचा नैसर्गिक प्रसुतीनंतर अवघ्या दहा मिनिटात मृत्यू झाल्याचा आरोप पती सागर शिरोडे यांनी केला आहे.

या संदर्भात शिरोडे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. मयत तेजल सागर शिरोडे यांचा नैसर्गिक प्रसुती हेऊनही मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूला डॉ.गणोरकर हॉस्पिटलच्या डॉ.शिल्पा (वृषाली) राजाध्यक्ष कारणीभूत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तेजल यांना प्रसूतीपूर्व रक्तदाबाचा त्रास होत होता. मात्र, डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. तसेच प्रसुतीदरम्यान चुकीचे इंजेक्शन दिल्याने तेजलच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. नैसर्गिक प्रसूती होऊनही तेजलची तब्येत कशी बिघडली याचे ठोस कारण डॉक्टरांनी दिले नसल्याचे शिरोडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तेजल यांना प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यापूर्वी एक दिवस त्रास झाला. मात्र त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. प्रसुतीनंतर अत्यवस्थ झाल्यानंतर तेजल यांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉ.राजाध्यक्षांसह इतर डॉक्टरांनी तपासणी केली.

मात्र प्रकृतीत सुधारण होईल या अपेक्षेने वेगवेगळ्या चाचण्यात करण्यात आल्या. प्रत्यक्षात तेजलचा मृत्यू झाला. त्यामुळे तेजलच्या मृत्यला डॉ.शिल्पा (वृषाली) राजाध्यक्ष यांना जबाबदार धरण्यात यावे व योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळाची आणि आईची साधी नजरभेटही होऊ शकली नाही. मातृत्वाचे सुखद स्वप्न रंगविणार्‍या तेजल शिरोडे यांच्यासमोर नियतीने वेगळेच ताट वाढून ठेवले होते. आता त्या नवजात बालकाचा सांभाळ कसा करायचा हा यक्ष प्रश्न सागर शिरोडे यांच्यासमोर उभा ठाकला असून एकीकडे पत्नी वियोगाचे दु:ख पचविताना तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांना धडा शिकविण्याच्या संघर्षाची तयारी अशी कसरत त्यांना करावी लागत असून आपल्यावर आलेली वेळ इतरांवर येऊ नये, यासाठीच हा संघर्ष असल्याचे सागर शिरोडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*