मॉन्सून आला, पण पाऊस कुठे? नाशिकमध्ये २२ जूननंतरच !

0

नाशिक ( विशेष प्रतिनिधी) ता. १३ – मागील आठवड्यात ८ जून रोजी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मॉन्सून दाखल झाला, त्यानंतर कोकण व मराठवाड्याच्या काही भागांत तो सक्रीयही झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली आहे. परिणामी हवामान खाते आणि खासगी हवामान कंपन्यांनी राज्यात मॉन्सूनचा पाऊस आला हे जाहीर करण्याची घाई तर केली नाही ना? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ११ जूनला मॉन्सूने राज्याचा काही भाग व्यापला, मॉन्सूनचे उत्तर टोक नगर जिल्ह्यासह बुलडाणा, अमरावती जिल्हयापर्यंत व्यापले होते. पण प्रत्यक्षात मॉन्सूनच्या पावसाऐवजी हे मॉन्सूनचे वारेच तेथे पोहोचले. त्याच दिवशी मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला आठ दिवसांचा ब्रेक लागल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले.

त्यानंतर मॉन्सूनपूर्व पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्यानंतर दडी मारल्याचे चित्र आहे. बळीराजाने खरीपासाठी शेत नांगरून तयार केले असून प्रत्यक्ष पेरण्यांसाठी मात्र त्याला आणखी काही काळ वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही अशी सध्याची स्थिती आहे.

या संदर्भात पुणे वेधशाळेच्या हवामानतज्ज्ञांनी ‘देशदूत’ ला सांगितले की मॉन्सून सक्रीय होण्यास पुरक स्थिती सध्या नसल्याने त्याची वाटचाल थांबली आहे. आणखी आठ दिवसांनी राज्यात मॉन्सून सक्रीय होऊ शकतो. परिणामी २१ जूननंतरच मॉन्सून राज्यात सक्रीय होण्याची शक्यता असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

पावसाच्या तोंडावर घराची शाकारणी करताना आदिवासी महिला (छायाचित्र : रविंद्र धारणे, त्र्यंबक)

दरम्यान नाशिकचे हवामान अभ्यासक आणि भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनीही मॉन्सून सक्रीय होण्यासाठी २२ जूननंतरचाच मुहूर्त उजाडू शकतो अशी शक्यता वर्तविली आहे. त्यानंतरच तो नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

गेल्या १० ते १५ वर्षांपासून मॉन्सूनच्या पावसाचा पॅटर्न बदलला असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सक्रीय होतो. हवामानखात्याने मात्र घाईने ७ ते १० जूनच्या दरम्यान मॉन्सून राज्यात सक्रीय झाल्याचे जाहीर केले. मात्र मुंबई आणि परिसरात झालेला पाऊस हा मॉन्सूनचा नसून मॉन्सूनपूर्व असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या मॉन्सूनचे वारे वाहत आहेत, पण त्यासोबत ढग मात्र आलेले नाहीत. त्यामुळे मॉन्सून खऱ्या अर्थाने अजून दाखलच झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये मागील वर्षी २२ जूनला मॉन्सून दाखल झाला होता आणि पुढील दोन दिवसांत तो जिल्ह्यात आणि परिसरात सक्रीय झाला होता. त्यानंतरच शेतकऱ्यांना पेरण्या करणे शक्य झाले. यंदाही जोपर्यंत मॉन्सून जिल्ह्यात दाखल होत नाही आणि ८५ ते १०० मिमी. पाऊस पडत नाही, तो पर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये.

त्यानंतरही वाफसा आल्याशिवाय किंवा ढेकळे पूर्ण भिजल्याशिवाय पेरण्या करू नये, अन्यथा दुबार पेरण्यांचे संकट येऊ शकते असा सल्लाही श्री जोहरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.  कृषी विभागानेही यंदा पावसात खंड पडणार असून पेरण्यांची घाई शेतकऱ्यांनी करू नये असा इशारा दिला आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केरळला मॉन्सून वेळेत आला पण पुढे त्याची वाटचाल अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कसा असतो मॉन्सूनचा पाऊस?

मॉन्सून आणि पूर्व मॉन्सूनचा पाऊस यात फरक असतो. सध्या राज्यात मुंबई, कोकणासह जो पाऊस झाला तो पूर्व मोसमी होता. या पावसात वादळी वारे आणि वीजांचा कडकडाट होतो. हा पाऊस थांबून थांबून येतो. तसेच पावसानंतर ऊनही पडते. मात्र मॉन्सूचा पाऊस सक्रीय झाल्यानंतर आभाळ काळ्या ढगांनी भरून येते. पावसाची सतत रिपरिप सुरू असते. मध्ये ऊन किंवा खंड पडत नाही.

LEAVE A REPLY

*