Blog : मृदगंधाने गंधाळला आसमंत

0

संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना गोदावरी नदी ओलांडली आणि घारपुरे घाटावरुन घराची वाट पकडली…साडेपाच सहाच्या दरम्यान अचानक आभाळ भरुन आले. क्षणभरात सृष्टीचा नूर पालटला आणि तापलेल्या तृर्षात धरणीवर पावसाचा हलका शिडकावा झाला. तत्पूर्वी सूर्य मावळतीला जाताना नाशिकला समृद्ध करणार्‍या गोदामाईच्या शिरावर रंगपश्‍चिमेचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला.

एव्हरी डार्क क्लाऊड हॅव अ सिल्वहर लाईन अर्थात प्रत्येक काळ्याकुट्ट ढगाला रुपेरी किनार असते, या म्हणीचा शब्दश: अर्थाचा प्रत्यय मला नभांगणात आला. काळ्याकुट्ट मेघांमधून सूर्यनारायण किरणे सोडवत होता. आणि क्षणभरच निळ्या मेघातून रुपेरी किनार पाहणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फडणारी नभकलाकृती सृष्टीने नभाच्या विशाल कॅनव्हासवर रेखाटली…. क्षणभरच हे दृश्य डोळ्यांसमोर आले आणि क्षर्णाधात गायबही झाले. आहाहा…..किती बरे सुंदर आहे हा निसर्ग..?असे उत्स्फूर्त उच्चार तोंडातून बाहेर पडले…सारेच स्वर्गीय…..!

हा नजारा याची देही डोळ्यात साठवतो तोच हलक्या पावसाच्या  शिडकाव्याने आसमंतात स्वर्गीय, अध्यात्मानुभूती देणारा मृदगंध भरुन राहिला..आहाहा…!

कुणी बरे तयार केला असेल हा मृदगंध…असा एक बाळबोध प्रश्‍न मनाला शिवला………

मानवाला सारे फ्रेगनन्स, कृत्रिम गंध करताही येईल एखाद्यावेळी… परंतु मातीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचा नव्हे अमृताचा स्पर्श झाल्यावर आसमंत गंधाळून सोडणारा हा परिमळ मानव कितीही विज्ञानात प्रगत झाला तरी तयार होणार नाही.

एरवी तृषार्त धरणीवर आपण पाणी टाकले तरीही हा गंध होत नाही, मात्र त्या विधात्याने स्वर्गातून टाकलेले अमृतच हा गंध निर्मितात. मृदगंध तयार करण्यार्‍या निर्मात्याचे हात मला याक्षणी पाहावेसे वाटले…….! किती बरे सुंदर असतो हा मृदगंध……..कुणी बरे भरला असेल त्यात हा परिमल…….. मी आंतरबाह्य गंधाळलो…गंधीत, सुंगधीत झालो; नव्हे तर आंतरबाह्य मृदगंध होऊन भरुन राहिलो…क्षणभर विचार आला……हा सुवास आत्ता याक्षणी कुपीत बंद करावा…अन् जीवनाचे राहटगाडगे ओढताना निराशेचे ढग, नकारात्मकतेचे मळभ दाटल्यावर ही अंतराची कुपी अलगत,  अलवार उघडता यावी आणि क्षणात निराशेचे, नकारात्मकतेचे मळभ पळून लावावे…

पण ….छे…….ही तर केवळ कवी कल्पना…..!

ना हा मृदगंध माणसाला निर्माण करता येत नाही हा सुरेख वास एखाद्या अंतराच्या कुपीत सामावता येत त्यासाठी हवी अनुभूती जी प्रत्येक मानव घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या डोळ्यांचे क्षितिज आणि घ्राणेंद्रियाचा परीघ वाढवा आणि बघा निसर्गाच्या प्रत्येक स्थित्यंतरात तो मानवला किती बरे काया काय  भेट देत असतो…कधी ही भेट सौंदर्यानी तर कधी गंधाने तर कधी अलवार स्पर्शनार्‍या गार गारव्याने ……पण हे सर्व टिपून घेण्यासाठी तुमच्याकडे हवे एक तरल भावनाप्रधान संवेदनशील मन…….हवीत सौंदर्य ,गंधाळलेले क्षण शोधणारी डोळ्यांची दोन  भिरभिरणारी पाखरे…… अन्  आणि त्या बदलाला टिपणारे एक संवेदनशील निसर्गप्रेमी मन.

भलेही हा वास अंतराच्या कुपीत बंदिस्त करता आला नाही, परंतु मी ऊरभरुन हा मृदगंध उरात भरुन घेतला…त्याची अनुभूती मनात साठवली. आणि देहाच्या अंतर्जाणिवांच्या खोळ गाभाऱ्यात हा मृदगंध अन् ढगातून सूर्यकिरण सोडवणारा ते रुपेरी दृश्य जतन करुन ठेवले..

दररोजचे जिणे व्हावे रुपेरी कोंदण

नवीनतेचा, लावण्याचा सूर्य दिसावा

आयुष्याचा प्रत्येक दिन

प्रगती अन् सौंदर्याचा मृदगंध होऊन दरवळावा….

-नील कुलकर्णी

LEAVE A REPLY

*