नगरसेवक शेट्टींच्या जीवदानासाठीच महासभा तहकूबीची चर्चा

0

नाशिक । दि.20 प्रतिनिधी
पंचवटीतल्या एका खून प्रकरणात सध्या नाशिकरोडच्या कारागृहात असलेले भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी त्याची महासभेला असलेली अनुपस्थिती पाहता त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

आजच्या महासभेस शेट्टी अनुपस्थित राहणार असल्यामुळे आणि त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठीच आजची महासभा तहकुब केली असल्याची चर्चा आज महापालिका वर्तुळात आहे. दरम्यान शेट्टी हे गेल्या 6 महिन्यांपासून कारागृहात असल्याने गेल्या 5 महासभांना उपस्थित नव्हते.

आज ते महासभेला अनुपस्थित राहिल्यास त्याचे नगरसेवकपद रद्द होणार होते. ही नामुष्की टाळण्यासाठीच भाजपकडून महासभा तहबुकीचा प्रपंच करण्यात आल्याची चर्चा लपून राहिली नाही.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हेमंत शेट्टी हे अगोदर राष्ट्रवादी कॉग्रसमध्ये सक्रिय होते. त्यांच्या पत्नी या राकॉ. पक्षाच्या गेल्या पंचवार्षिक काळात महापालिकेत नगरसेविका होत्या. मात्र ते राहत असलेल्या भागात आरक्षण बदल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले. परंतु निवडणुकीनंतर दोन महिन्यांतच पंचवटीत गाजलेल्या एका खुनाच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे गेल्या मे महिन्यात त्यांना शहर पोलीसांनी अटक केली.

त्यानंतर त्यांचा अद्यापही मुक्काम नाशिकरोड कारागृहात असल्याने त्यांना गेल्या सहा महिन्यात महापलिकांच्या महासभांना हजर राहता आलेले नाही. महापालिका अनिधिनियमातील एका नियमामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. नगरसेवकाला आपले पद टिकविण्यासाठी महासभेला उपस्थिती लावावी लागते. सतत सहा महासभांना नगरसेवकाची अनुपस्थित राहिली तर त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची तरतूद आहे. शेट्टी गेल्या पाच महासभांपासून अनुपस्थित आहेत.

आजच्या महासभेत शेट्टी अनुपस्थित राहिल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द होणार होते. त्यामुळे शेट्टींचे नगरसेवकपद वाचवण्यासाठी भाजपने अप्रत्यक्षरित्या काही दिवसांपासुन प्रयत्न सुरू आहे. महासभेच्या एक दिवस अगोदर शेट्टींना एक दिवसासाठी कारागृहातून बाहेर काढण्यासाठी काही पदाधिकार्‍यांचा आटापिटा सुरू झाला आहे.

दुसरीकडे महासभेवर त्यांच्या नावाचे प्रस्ताव सादर केले असून, त्यावर चर्चा करण्यासाठी शेट्टींना महासभेत यायचे आहे. त्यामुळे त्यांना महासभेसाठी बाहेर येण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज शेट्टींच्या वतीने कारागृह अधीक्षकांकडे करण्यात आला आहे.

मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर आज सोमवारी सुनावणी होणार असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. आज सुनावणी होऊन न्यायालयाने शेट्टी यांना पुढच्या महासभेपर्यत कारागृहाकडुन परवानगी मिळाल्यास त्यांना महासभेला हजेरी लावता यावी म्हणुनच आजची महासभा तहकुब करण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात आहे.

LEAVE A REPLY

*