नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाला ‘अपूर्व’ रंग.. भाजपसाठी धोक्याची घंटा

0

दिलीप कोठावदे, नवीन नाशिक

गोल्फक्लब येथे शिवजयंतीला संपन्न झालेल्या कार्यक्रमानंतर शहरात शोभायात्रा काढण्यात आली. मात्र पूर्वपरवानगी नसल्याने पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले. त्यात भाजपाचेच आमदार, राज्यपदाधिकारी होते. त्यानिमित्ताने भाजपामधील गटांचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. या घटनेनंतर आगामी काळात नाशिकच्या राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

राजकारणात सगळे काही क्षम्य असते या न्यायाने शहराच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांपाठोपाठ ‘ओबीसी संगठन’च्या नार्‍यांनी आगामी काळातील राजकारणाची दिशा सूचित केली आहे.

शहरात, राज्यात आणि देशात यत्र..तत्र..सर्वत्र भाजपचीच एकहाती सत्ता असली तरी सत्ताकारणाचे नव्याचे नऊ दिवस संपताच पक्षांतर्गत भांड्याला भांडे लागू लागले असून आता त्याचा नाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत ऐकू येऊ लागला आहे.

सत्तासुंदरीच्या सहवासासाठी स्थानिक राजकारणातील अनेक नामवंत चेहरे भाजपच्या संपर्कात आले आणि भाजपत सामीलही झाले. मात्र बुद्धिवाद्यांच्या बौद्धिक राजनीतीमध्ये या दिग्गजांचा जीव घुसमटू लागला. एकेका पावलाने अस्वस्थताही वाढू लागली आणि 2019 च्या राजकीय लढाईच्या पार्श्वभूमीवर आता या अस्वस्थांच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे.

शिवजयंतीला नाशिक शहरात निघालेल्या शोभायात्रेचे संग्रहित छायाचित्र

सगळ्या अस्वस्थांची मोट बांधून एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची धडपड सद्यस्थितीत सुरू झाली असून येत्या काळात नाशिक शहर व जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे. शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे हे सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत असले तरी मुळात काँग्रेसी विचारधारेशी नाळ जोडलेली असूनही सद्यस्थितीत त्यांनी भाजपशी जुळवून घेतले आहे. मात्र स्थानिक पातळीवर त्यांचे अस्तित्वच दुर्लक्षित केले जात असल्याने त्यांच्या अस्वस्थतेला खतपाणी घातले जात आहे.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली त्यांची अस्वस्थता आता लपून राहिलेली नाही आणि त्यांनीही ती लपवण्याचा प्रयत्न फारसा केलेला नाही. सलग तीन वेळेला तालिका सभापतिपदाचे गाजर त्यांच्या हाती दिल्याचे भाजपेयींकडून छाती ठोकून सांगितले जात असले तरी या पदाची स्थिती औट घटकेच्या राजासारखी असल्याने राजकारणातील मोठी स्वप्ने पाहणार्‍या अपूर्व हिरे यांना ते गाजर पचनी पडलेले नाही. म्हणूनच एकेकाळी राजकारणातील कट्टर शत्रू असलेल्या भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी संगठनच्या नावाखाली आपल्याच पक्षाच्या, आपल्याच सरकारच्या विरोधात भाषणबाजी करण्याचे धाडस त्यांनी केले.

त्यांच्याप्रमाणेच एकेकाळी जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या सुनील बागुल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हातात घेतले. मात्र शिवसेनेत असताना ज्याच्या नुसत्या डरकाळीच्या शंकेनेही राजकारण्यांची गाळण उडत होती त्या वाघाचे अस्तित्व भाजपत केवळ होर्डिंगवर छबी मिरवण्यासाठी आणि भाजप नेत्यांच्या सभांमध्ये मंचावरील कोपर्‍यात खुर्चीवर विराजमान होण्यापुरतेच मर्यादित राहिल्याने बागुल यांची अवस्था पिंजर्‍यातील वाघासारखीच झाली आहे.

हिरे, बागुल यांच्याप्रमाणेच विविध पक्षांतून आलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या जिल्ह्यातील अनेक राजकीय धुरंधरांची अवस्था फारशी वेगळी नाही. त्यामुळे अशा सर्व पक्षांतर्गत अस्वस्थांची मोट बांधून त्यांना ओबीसीच्या झेंड्याखाली एकत्र आणून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.  हा प्रयत्न किती प्रभावशाली ठरेल हे येणारा काळ ठरवणार असला तरी सत्तेपुढे शहाणपण फिके ठरते या न्यायाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेना अशा वेगवेगळ्या विचारधारांचे भाजपत आलेले नेते भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांचे वरकरणी अस्तित्व भाजपमध्येच असले तरी येत्या काही दिवसांत..महिन्यांत या स्थितीत बदल होण्याची चिन्हे अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहेत.

जाता जाता…

नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी संघटित झालेल्या सर्वपक्षीय समितीमध्ये वरकरणी भाजपचाच बोलबाला असला तरी या अस्वस्थ गटाकडेच नियोजनाची सूत्रे होती. त्यामुळे भाजपांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने इथेही डोके वर काढले आणि पूर्वपरवानगी नसताना नियोजनबद्ध शोभायात्रा काढल्याप्रकरणी समितीच्या पदाधिकार्‍यांविरोधात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेशांचे उल्लंघन केले म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी शिक्षक आ.डॉ.हिरे यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी असून शहर व जिल्ह्याच्या राजकारणात येणार्‍या काळात होऊ घातलेल्या वादळी बदलांची सूचना देणारी आहे. त्यामुळे 2019 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी नाशिक शहर व जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यास नवल वाटू नये.

भाजपसाठी धोक्याची घंटा

गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असूनही भाजपतील अंतर्गत कलहाने भांड्याला भांडे लागू लागले असून त्यांचा आवाज आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. येणार्‍या काळात हा अंतर्गत कलह शमवण्याचे आव्हान पक्षासमोर उभे राहिले आहे. याशिवाय भाजपतील असंतुष्टांच्या गटाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा अस्वस्थ मानसिकतेची कारणे शोधण्याची व त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यात आगामी राजकारणात अस्वस्थांची मनोभूमिका भाजपसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता अधिक आहे.

LEAVE A REPLY

*