दाखल्यांसाठी जादा दर आकारल्यास कारवाई

‘आपले सरकार’ केंद्र चालकांना तंबी, दाखले मुदतीत देण्याचे आदेश

0
नाशिक । प्रतिनिधी- विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले हे दिलेल्या मुदतीतच वितरित करावे, तसेच दाखल्यांसाठी शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे, अतिरिक्त शुल्क आकारल्याची तक्रार आल्यास केंद्रावर कारवाई करण्याची तंबी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी आपले सरकार केंद्रचालकांना दिली. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच दहावी, बारावी परीक्षांचे निकालही जून महिन्यात जाहीर होणार असल्याने प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या शेैक्षणिक दाखल्यांसाठी केंद्रांवर गर्दी होणार आहे.

यंदा प्रशासनाने सेतू केंद्र बंद करून आपले सरकार केंद्र सुरू केले आहेत. शहरात सध्या 83 केंद्र कार्यरत आहेत. नागरिकांनी घरूनच आपले सरकारमार्फत दाखले काढावेत, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे, परंतु ज्यांना दाखले काढण्यात अडचणीत आहेत त्यांनी आपले सरकार केंद्रामार्फत दाखले मिळवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यापार्श्वभूमीवर आज शहरातील सर्व केंद्रप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. नागरिकांची व विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची सर्वतोपरी खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी डॉ. मंगरूळेंनी दिले.

दाखल्यांसाठी विहित केलेले शुल्कच आकारावे. त्यापेक्षा अधिकचे शुल्क कोणी घेत असल्यास तसेच त्याबाबत काही तक्रारी आल्यास संबंधित केंद्रचालकावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ऑनलाईन पद्धतीत कोणतीही अडचण आल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. संबंधित अडचण लगेचच सोडविण्यात येईल, असे आश्वासही डॉ. मंगरूळेंनी केंद्र चालकांना दिले.

केंद्रांना आचरसंहितेचा फटका

शहरात सध्या 83 आपले सरकार सेवा केंद्र कार्यन्वित आहेत. यामध्ये आणखीन 30 केंद्रांची भर पडणार आहे. मात्र, सध्या विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता लागू असल्याने हे केंद्र सुरू करता येत नाही. आचारसंहिता शिथील झाल्यावर केंद्रांना तत्काळ मान्यता दिली जाईल, अशी माहिती डॉ. मंगरूळे यांनी दिली. दरम्यान, ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्रांचे आपले सरकारमध्ये रूपांतर करणे सुरू आहे. आजमितीस 1381 पैकी 750 केंद्रांचे रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

LEAVE A REPLY

*