Friday, April 26, 2024
Homeनाशिकआयटी हब होण्यास नाशिक सक्षम; शहर परिसरात वाढतेय कंपन्यांचे जाळे

आयटी हब होण्यास नाशिक सक्षम; शहर परिसरात वाढतेय कंपन्यांचे जाळे

नाशिक । दिनेश सोनवणे

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या नाशिक शहरात आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या २५० पेक्षा अधिक लहानमोठ्या कंपन्या काम करत आहेत. कंपन्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असले तरीही या कंपन्यांना पायाभूत सुविधा, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तसेच प्रशिक्षणावर आधारित शिक्षण मिळाले तर या कंपन्या कुठल्या कुठे पोहोचतील, परिणामी नाशिकला आयटी हब सहज साकारण्यास मदत होणार आहे.
शहरात क्वॉलिटी ऑफ लाईफ उत्तम आहे. पर्यटनाच्या मोठ्या संधी शहरात आहेत. अवघ्या काही मिनिटांत सेवक घरापर्यंत पोहोचणेही शक्य आहे. इथले वातावरण नेहमीच आल्हाददायक असते.

- Advertisement -

जो कुणी नाशिकमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने येतो तो शहरात कायमस्वरुपी स्थायीक होण्याचा विचार करतो. आयटी क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. एअर कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न फळाला लागले, तर या क्षेत्राला बुस्टर मिळणार आहे. डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकमध्ये साकारण्यात येणार आहे, त्यामुळेही नाशिकच्या आयटी क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आयटीसह सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट आहे. तरीदेखील नाशिकमध्ये लहानमोठ्या आयटी क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्या तग धरून आहेत. अनेक कंपन्या छोटेखानी बसून अमेरिका, युरोपसारख्या क्लायंटस्ला हाताळताना दिसतात. शहरातील एका नामवंत कंपनीत थेट जर्मनीच्या कंपनीने गुंतवणूक केली आहे.

यामुळे आज ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) काम करणार्‍या प्रसिद्ध कंपन्यांत गणली जाऊ लागली आहे. छोटेखानी सुरु झालेली कंपनी मजल-दरमजल करत आज या स्तरावर पोहोचली आहे. आयटी क्षेत्राची व्याप्ती वाढण्यासाठी शिक्षण गरजेचे आहेच, शिवाय उपक्रमावर आधारीत प्रयोगशील शिक्षणपद्धती उपलब्ध झाल्यास येथील शिक्षित मनुष्यबळ इतरत्र स्थानांतरीत होणार नाही, परिणामी शहर विकासाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल हे नक्की.

कौशल्यव्याप्ती वाढण्याची गरज
कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची कमतरता नेहमीच भासते. यासाठी निटा (नाशिक इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी असो.) कडून शहरातील पाच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. कंपन्यांसाठी दक्षिण आफ्रिका, युरोपातील ट्रेड कमिशनच्या तज्ञांना पाचारण करून कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. तसेच नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या सदस्यांनी सवलतीच्या दरात इतरत्र प्रशिक्षणाला पाठविण्यात येत आहे.
अरविंद महापात्रा, अध्यक्ष निटा

नाशिक आघाडीवरच…
नाशिकच्या आयटी क्षेत्राने स्टार्टअप, प्रॉडक्ट आणि प्रोग्रामिंगमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. कंपन्यांना कायद्याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. आयटी हब साकारण्यासाठी शासनाने हक्काची जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. आयटी हब होण्यासाठी जमिनींच्या किमती कमी केल्या पाहिजेत. शासनाचे प्रशिक्षित मनुष्यबळासाठी योजना आखायला हव्यात.
गिरीष पगारे, कुंभथॉन इनोव्हेशन फाऊंडेशन

याकडे लक्ष देण्याची गरज –

* सरसकट कंपन्यांचे कॉमन ब्रँडींग झाले पाहिजे

* परदेशातील मार्केट अ‍ॅक्सेस मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

* शहरातील विखुरलेल्या कंपन्यांनी एका प्लॅटफॉर्मवर येण्याची गरज.

* वस्तू आणि सेवा याचे योग्य मूल्यमापन करून कंपनीने पुढे जावे

* परदेशातील व्यवहारासाठी कंपन्या हाताळताना मार्गदर्शनकांची मदत घ्यावी

* कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीसाठी कार्यशाळा, कंपनी ट्रेनिंग झाले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या