सरत्या वर्षाचे आज अखेरचे ‘सूर्यग्रहण’; खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणामुळे घडणारी खगोलीय घटना अर्थात खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी आज गुरुवार (दि.२६ ) सकाळी ८ ते ११ या वेळेत नाशिककर खगोलप्रेमींना मिळणार आहे.

देशातील काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण अर्थात ‘रिंग ऑफ फायर’ दिसणार आहे. देशाच्या दक्षिणेकडील राज्यात हे कंकणाकृती ग्रहण दिसणार असून दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती तर उर्वरित भारतातून नाशिकसह औरंगाबाद येथे खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

ही एक निसर्ग व अंतराळाशी नाते जोडणारी दुर्मिळ संधी असणार आहे, अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम ए. पी. जे. अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. अर्ध्या जगातून दिसणारे हे सूर्यग्रहण भारतात सर्वाधिक चांगले दिसणार आहे.

कंकणाकृती ग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ८ वाजता होईल. महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून ८० ते १० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी ८:१० वाजेपासून दिसेल. ९:३२ वाजता ग्रहण मध्य असेल तर सकाळी ११ वाजता ग्रहण समाप्ती होईल. वेल्डिंग करताना डोळ्यांच्या संरक्षणासाठी वापरला जाणारा चष्मा किंवा पूर्णपणे काळा चष्मा सूर्यग्रहण पाहताना वापरता येईल, अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिली.

कंकणासारखी प्रकाशाची कडा
कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणार्‍या खग्रास ग्रहणावेळी पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सरासरीपेक्षा कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते. म्हणून सूर्यबिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते. परंतु कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर जास्त असते. तेव्हा सूर्यबिंबापेक्षा चंद्रबिंब लहान दिसते. यामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही आणि कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते. त्यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतो.

कुठून पाहाल?
ग्रहण पाहण्यासाठी आपल्या जवळ पूर्वेकडील खुले आकाश असलेली मोकळी जागा निवडा.

सुरक्षितपणे ग्रहण कसे पाहाल?
सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघू नका. सूर्यग्रहण सर्वसाधारण सनग्लासेसने पाहणे सुरक्षित नसते. सूर्य आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेले ग्रहण चष्मे वापरा.

सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपासून १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत ग्रहणकाळ आहे. तसेच ग्रहणकाळात काही खातपीत नाही. देवाची आराधना या काळात करावी. उपासना करावी तसेच स्तोत्र पठन करावे. या काळात मंत्रांना मालिन्य येत नाही. ग्रहण सुटल्यावर स्नान करून धार्मिक विधी तसेच दानधर्म करावा.
– सतीश शुक्ला, अध्यक्ष, पुरोहित संघ

अंनिस दाखवणार सूर्यग्रहण
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रामकुंड, गोदावरी नदीतीरावर सौर चष्म्याने मोफत सूर्यग्रहण दाखवले जाणार आहे. जास्तीत-जास्त नाशिककरांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन अंनिसच्या कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *