LIVE : समता दृष्टीत असते : चैतन्य महाराज; वै. बस्तीरामजी सारडा पुण्यतिथी सोहळा

0

नाशिक : अनेकत्व एकत्र येते त्याला समता म्हणायचे. संतांनी समानता शिकवली. समता ही दृष्टीत असते. ती दृष्टी मात्र प्राप्त झाली पाहिजे. तुम्ही आणि मी समान आहोत ही दृष्टी हवी. समता प्राप्त करण्यासाठी अनेकत्व नाकारावे लागत नाही. अनेकत्वाच्या दर्शनात समानत्वाचा प्रत्यय येतो. जेथे अनेकत्व नाही तेथे समता असू शकत नाही, अशा शब्दांत ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी समतेचा विचार उलगडून दाखवला.

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या 55 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमाला परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सुरू आहे. ‘संतांना अपेक्षित असलेली सामाजिक समता समाज का स्वीकारत नाही?’ या विषयावरील दुसरे पुष्प आज चैतन्य महाराजांनी गुंफले. सुरूवातीला वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या अर्धाकृती पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला.

व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या श्रोंत्यांनी पहिल्या दिवसाप्रमाणे सभागृह तुडुंब भरले होते. संतांना ओव्या, अभंग लिहायला कोणी सांगितले होते का? तरीही संत साहित्याची निर्मिती झालीच ना? कारण संतांच्या अंत:करणात तुमच्या-माझ्याबद्दल करुणा निर्माण झाली म्हणून. करूणा हे फळ आहे. समता हेही फळ आहे. झाड लावल्याशिवाय फळ मिळत नाही. त्यासाठी झटावे लागते. तरच तत्वदृष्टी येते. समता त्याचेच फळ आहे. भूतभेद व्यवस्था मोडकळीला येते, पण केव्हा? आत्मस्वरुपाचे ज्ञान होते तेव्हा भेद मोडीत निघतात. पाटीवरची अक्षरे सहजतेने पुसता येतात. तसे समाजातील भेदसुद्धा आपल्या विचारांतून पुसता येतात. ज्याला ज्ञान झाले, सर्वांचे समानत्व कळले त्याला त्या दृष्टीने भेद दिसत नाहीत. सगळे समान दिसतात. भेदाचा वाद संपला की अभेदाचा वाद संपतो, असा विचार चैतन्य महाराजांनी मांडला.

समतेसाठी कष्ट करायला माणूस तयारच नाही. संतांनी जी समता सांगितली ती कोणत्या ना कोणत्या एकरूपतेत बघावी लागते. ज्ञानेश्वरांनी समतेची व्याख्या केली. ती परिपूर्ण आहे. त्यात न्यूनत्व असू शकत नाही. कोणाही विचारवंताने साम्याची अशी व्याख्या पाहिलेली नाही. कोणत्याही समाजशास्त्राच्या ग्रंथात ती नाही. आठव्या अध्यायाच्या दृष्टांतात समतेची व्याख्या ज्ञानेश्वरांनी दिली आहे. ‘जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन झाले’. इतकी परिपूर्ण व्याख्या जगाच्या पाठीवर नाही. आधी अंकूर, मग दोन पाने, सहस्त्रावधी पाने, फांद्या… एका बीजातून वृक्षाचा विस्तार होतो. वडाचे झाड अनेक वर्षे जगते. त्याचा विस्तार होतो. खोड कोणते आणि फांद्या कोणत्या ते कळत नाही. ज्ञानेश्वरांनी फार चांगली उदाहरणे देऊन ठेवली आहेत. रस्त्याने जाणार्‍या अनवाणी माणसाच्या पायात काटा भरतो. पटकन त्याच्या डोळ्यांत पाणी येते. पाय आणि डोळ्यांचा काहीतरी संबंध असावा. पाय कर्मेंद्रिय आहे, असे डोळा म्हणत नाही. पाय असले तरी ते माझे आहेत हे डोळा समजतो. दुसर्‍याला झालेले दु:ख बघून स्वत:ला कष्ट होतात.

सर्वत्र समतेची प्रचिती येणे हे तत्वविचारांचे फलित आहे. हे तत्वज्ञान जगणे होय. संतांनी समानता पाहिली म्हणजे ते तत्वज्ञान जगले. एखादी व्यक्ती पडली असताना तिला मदत करण्याचा केवळ विचार करून उपयोगाचा नाही. प्रत्यक्ष मदतीची कृती केली पाहिजे. तिला हात देऊन उठवले पाहिजे. पारमार्थिक चिंतनाचा विचार सर्वांना हवाहवासा वाटतो. तो विचार मनात येतो. तो कृती करण्याचा प्रयत्न करतो, पण कृती करावी की नाही या विचंचनेत अडकतो. खरे बोलावे की खोटे? खोटे बोलावे असे म्हणणारी माणसे फार मिळणार नाहीत.

अशी संदिग्धता निर्माण होते तेव्हा खरे बोलणे व खोटे बोलणे यातील गुणदोष लक्षात घेतल्यावर खरे बोलतो ते साधकाचे लक्षण आहे. ठरवून खोटे बोलले की काय फरक पडतो? खरेच बोलावे असे एक मन म्हणते. आज खोटे बोलू, उद्यापासून खरे बोलू, अशा वैचारिक युद्धातून खरे बोलायचे प्रयत्न माणूस करतो आणि संभ्रमात पडतो. असे न अडखळता खरे बोलतो तो संत, असे चैतन्य महाराज यांनी सांगितले.

वाढदिवस आणि खुजराचे झाड
खजुराला साठ वर्षांनी फळ येते असे म्हणतात. ऐंशी वर्षाची एक व्यक्ती आपल्या वाढदिवशी खजुराचे झाड लावते. तुम्ही ऐंशी वर्षाचे आहात. तुम्ही लावलेल्या झाडाची फळे खाण्यासाठी साठ वर्षे जगणार आहात का? मग खजुराचे झाड लावून काय उपयोग? असे एक जण विचारतो. हाच विचार सगळ्यांनी केला असता तर मला आज खजूर खायला मिळाला नसते, असे उत्तर येते. एकूणच फळासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत, असे अंतर्मुख करणारे उदाहरण चैतन्य महाराजांनी श्रोत्यांपुढे मांडले. व्याख्यानाची सांगता श्रीकांत घोलप यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली.

क्रोध कोणावर करायचा?
‘कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता’ असे तुकाराम महाराज म्हणतात. आता कोणी क्रोधाचा प्रयत्न केला तरी क्रोध येत नाही. या अभंगाचा भावार्थ सांगताना चैतन्य महाराजांनी दात आणि जिभेचे उदाहरण दिले. कधी-कधी जेवताना दाताखाली जीभ चावली जाते. जीभ चावताना दात विचार करीत नाहीत. चावण्याची क्रिया ते करतात. वेदना होतात, पण त्याबद्दल क्रोध कोणावर करायचा? रागावणे शक्य नसते. कारण सगळे आपलेच आहे.

 

ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे LIVE व्याख्यान

LEAVE A REPLY

*