Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकसभापती चारोस्करांकडून व्यासपीठाचा त्याग; जि. प. स्थायी समिती बैठकीत प्रशासनाचा निषेध

सभापती चारोस्करांकडून व्यासपीठाचा त्याग; जि. प. स्थायी समिती बैठकीत प्रशासनाचा निषेध

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार प्राची वाजे यांच्याकडून रातोरात काढून घेत अध्यक्षा, उपाध्यक्षा व समाजकल्याण सभापतींना प्रशासनाने अंधारात ठेवल्याचे पडसाद मंगळवारी (दि.१७) स्थायी समितीच्या बैठकित उमटले. या मुद्यावरून उपाध्यक्षा नयना गावीत, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी व्यासपीठाचा त्याग करत सदस्यांच्या रांगेत उभे राहत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवला. वाजे यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच नशलेश पाटील यांच्याकडे पूर्णवेळ कारभार सोपवण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिल्यानंतर सभापती व्यासपीठावर विराजमान झाले.

- Advertisement -

अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पाटील, समिती सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर गावित, यतीन कदम, सविता पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे उपस्थित होते. अखर्चित निधीवरुन प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील द्वंद्व शांत झाल्याचे संकेत असले तरी, बैठकीच्या प्रारंभीच समाजकल्याण विभागाच्या कारभारावरुन वादंग सुरु झाले. या विभागाला तीन महिन्यांत अनेकदा अधिकारी बदलण्यात आल्यामुळे कोट्यवधींचा निधी अखर्चित राहिला आहे. याचा निषेध म्हणून या खात्याच्या सभापती सुनीता चारोस्कर यांनी व्यासपीठाचा त्याग करत सदस्यांमध्ये विराजमान झाल्या.

प्रभारी समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे यांनी शिष्यवृत्तीचे बरेच काम प्रलंबित असल्याचे सांगत रातोरात जिल्हा परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सोडला. विशेष म्हणजे त्यांनी याबाबत अध्यक्षा सांगळे व सभापती चारोस्कर यांना ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे माहिती दिली. त्यामुळे बैठकीत पदाधिकारी आणि सदस्यही आक्रमक झाले. याच मुद्यावरून चारोस्कर यांनी व्यासपीठाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. चारोस्कर यांच्या पाठोपाठ उपाध्यक्ष नयना गावित, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनीही निषेध करत व्यासपीठ सोडले. समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नसल्याने निधी खर्च होत नाही, अशी भूमिका सभापतींनी मांडली. माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती देऊन त्यांनी कार्यभार सोडल्याची तक्रारही चारोस्कर यांनी केली. विशेष म्हणजे वाजे यांनी कार्यभार सोडत असताना बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती दिली नव्हती. ‘व्हॉट्सअप’वर पाठवलेला संदेश भुवनेश्वरी एस. यांंना दाखविल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली.

स्थायी समिती बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी वाजे यांनी घेतलेली नसल्यामुळे त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन, सामान्य प्रशासन विभागाचे आनंद पिंगळे यांनी दिले. तसेच समाजकल्याण विभागाचा पूर्णवेळ कारभार नीलेश पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्याचे आश्वासन देत सभापतींना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या