नाशिक | तलवारबाजी माझा श्‍वास – स्नेहल विधाते-जाधव (तलवारबाजी)

0
स्नेहल विधाते-जाधव(तलवारबाजी)
तलवारबाजी सारख्या वेगळ्या खेळात नाव कमवता आले याचा आनंद होतोय. मला नाशिकच्या मातीतून याच खेळात मला अनेक खेळाडू घडवायचे आहे. एखाद्याने क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवले तर यामध्येही उत्तम करियर होऊ शकते हे अनुभवातून सांगते. आज फेनसिंग हा माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग झालाय. खेळाशिवाय जीवन ही कल्पनाच करवत नाही. खेळाने मला आत्मविश्‍वास, नावलौकीक, मानसन्मान आणि चांगला जीवनसाथी आणि जगण्याचा श्‍वास दिलाय.
माझे वडिल मर्दानी खेळाचे खेळाडू आणि प्रशिक्षकही आहेत. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मी खेळाकडे वळाले. बालपणी, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, पोहणे, असे खेळही खेळत. शाळेत असताना अशोक दुधारे सरांनी उन्हाळी क्रीडा  शिबीर घेतले त्यामध्ये पहिल्यांदा मला तलवारबाजी या खेळातील गुुण हेरुन या वेगळ्या खेळासाठी प्रोत्साहन दिले. आणि मी वयाच्या १३ वर्षीच या खेळात उतरले.
पूर्वी युरोपिय देशांमध्ये विशेषत: फ्रेंचमध्ये फेनसिंग युद्धकला म्हणून प्रसिद्ध होती. कालांतराने हा खेळ म्हणून गणला गेला. इपी, फॉईल आणि सॅबर अशा तीन प्रकारात हा खेळ खेळला जातो. ऑम्लिपिकमध्ये हा खेळ १०० वर्षांपूर्वीआला त्यानंतर तो भारतात येईपर्यत १०० वर्षाचा काळ उलटावा लागला. नाशिकमध्ये फेनसिंग १९९२ या वर्षात आले. अशा वेगळ्या खेळामध्ये मी उतरली माझा छंद करिअर कसे झाले मलाच कळाले नाही.

 मी सॅबर प्रकारात खेळते. त्यामध्येे वेपनने वार करायचा असतो. या खेळात जो उत्तम खेळाडू असतो तो वैयक्तिक स्पर्धेमध्ये खेळतो. मी सांघिक आणि वैयक्तिक अशा दोेन्ही पातळीवर खेळत आहे. राज्यस्तरावरील दोन सर्वोत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पाठवले जाते. तलवारबाचींचे प्रशिक्षण दुधारे सरांकडे सुर असताना मी राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी दोनदा खेळले मात्र दोन्ही वेळा यशाने हुलकावणी दिली.

त्यानंतर नांंदेड येथे झालेल्या १७ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत पहिलांदा मला सांघिक आणि वैयक्तिक पातळ्यावर मी दोन सुवर्ण पदकांची कमाई करत अपयश धुवून काढले. या यशाने मला स्वत:ला या खेळात नवी ओळख मिळालीच परंतु नाशिकचा तलवारबाजीमध्ये वेगळा ठसा राज्यात मिळाला. या यशाने माझ्यातला आत्मविश्‍वास दुणावला आणि माझी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवड झाली आणि ४ राष्ट्रीय स्पर्धेत खेळुन मी पदकांची कमाई केली. चढत्या क्रमाने माझी होत असलेली प्रगती मला जिंकण्याची प्रेरणा देऊ लागली.
पहिल्यादा खेळताना नाशिकचे नवा असलेला पोषाख मी धारण केला होेता त्यानंतर महाराष्ट्र आणि नंतर देशाचे प्रतिनिधित्त्व आंतरराष्ट्रीयं पातळीवर केले. पहिल्यांदा जेव्हा मी चेन्नई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताकडून खेळले तेव्हा मला आनंद गगणात मावत नव्हता. इंडियाचा ट्रॅकसूट घालून मी जेव्हा खेळले तेव्हा सोनरी स्वप्नाची स्वप्नपूर्ती मी अनुभवली. त्यावेळी मला रौप्य पदक मिळाले नंतर हैद्राबादमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी दोन पदकांची कमाई केली.
राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. त्यादिवशी मला जग जिंकल्याचा आनंद झाला. एका महिला खेळाडूचे विवाहनंतर जीवन बदलू शकते. खेळ म्हटलं की महिना दोन महिने घर सोडून बाहेर राहावे लागते. हे विवाहनंतर दरवेळी शक्य होईलच असे नसते. मलाही असा जोडीदार हवा होता जो मला विवाहानंतरही खेळात करिअरसाठी साथ देईल रोहीत जाधव यांच्या रुपाने ते मला गवसले. ते स्वत:ही उत्तम कराटे पटू आहेत. त्यामुळे माझ्या खेळासगट मला स्वीकारुन मला या खेळात प्रोत्साहन, उमेद देणारे माझे पती आणि सासु-सासरे मला मिळाले यासाठी कोणती पुण्याई कामी आली मला माहिती नाही परंतु यामुळेच स्वत:ला खूप भाग्यवान समजते.माझ्या वडिलांनी मला क्रीडा संस्कार दिला.दुधारे सरांमुळे मला खेळाडू नावारुपाला आणले आणि विवाहनंतर माझे पती रोहीत जाधव या तिघांचे माझ्या जडणघडणीतील योगदान मी कधीही विसरु शकत नाही.
गेल्या १५ वर्षांपासून मला फेनसिंग खेळाने जे शिकवले तेच मी माझ्या विद्यार्थ्यांना देत आहे. सध्या मी २६ विद्यार्थीना तरबेज करत आहे. प्रशिक्षण म्हणून हा खेळ पूढे नेण्यात मनस्वा आनंद वाटतो. माझ्या घरी शस्त्रांचे वस्तुसंग्राहलयही आहे. नाशिकमध्ये सुंदर क्रीडा संस्कृती रुजली आहे. त्यामुळे मुलांनी निदान दोन तास तरी क्रीडांगणावर जाऊन खेळलेच पाहिजे. विशेषत: मुलींना माझे सांगणे आहे की तुम्ही निदान मैदानावर जाऊन पळण्याचा सराव करा. त्यामुळे निरोगी राहाल आणि स्व-संरक्षणासाठीही खेळ तुम्हाला खूप मदत करते.
आज शासन पातळीवरुनही खेळ आणि खेळाडूंनासाठी खूप चांगले कार्य होत आहे. त्यामुळे क्रीडा प्रकारात करियर होण्यासाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. नााशिकमध्येही सर्वाधिक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. शेवटी एकच इच्छा आहे. औरंगाबाद, सांगली आणि पुण्यात जसे मनपाने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठी महापालिकेत नोकरीच्या संधी देण्याचे ठराव संमत केला त्याच प्रमाणे नाशिक महापालिकेमध्येही असा ठराव व्हावा, अशी अपेक्षा आहे.
(शब्दांकन :  नील कुलकर्णी)

पुढील मुलाखत  : विजयालक्ष्मी मणेरीकर (शिक्षण)

LEAVE A REPLY

*