Video : कुसुमाग्रजांच्या कवितांना नृत्याविष्कराचे सुरेख कोंदण

0

नाशिक । प्रतिनिधी

कीर्ती कला मंदिर या कथक नृत्य साधनेला वाहिलेल्या संस्थेने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या रचनांना पदन्यास, भावमुद्रा काईक अभिनयातून सुरेख अविष्कार सादर केला. रविवारी (दि.10) एकाच वेळी तीन वेगवेगळ्या रंगमंचावर तात्यांच्या कवितांवर आधारित नृत्यांचा रसयात्रा हा अनोखा कार्यक्रम सादर करून वाहवा मिळवली.

कुसुमाग्रज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कालिदास कलामंदिर, सायखेडकर नाट्यगृह आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा तीन ठिकाणी एकाच वेळी रसयात्रा सादर झाली.

कविराजांच्या अमृतमहोत्सवी वर्षात कीर्ती कला मंदिराच्या संस्थापिका रेखा नाडगौडा आणि कुमुद अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून रसयात्रेचा जन्म झाला. बाळ भाटे यांची संगीतसाथ यात्रेला लाभली.

अपर्णा मयेकर, रंजना जोगळेकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, उत्तरा केळकर, अरुण इंगळे, त्यागराज खाडिलकर आदींनी या कविता त्यावेळी गायल्या होत्या.

खुद्द तात्यांनी या सादरीकरणास दाद दिली होती. नंतर 88 साली तात्याना ज्ञानपीठ मिळाल्यावर हा कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला गेला.

त्यानंतरही रसयात्रेचे प्रयोग होत राहिले. नवनव्या कलाकारांना रसयात्रेतील कविता मोहवीत राहिल्या. मात्र चार दशकानंतर आदिरेखा यांनी नव्या संचात काल सादर केलेल्या कार्यक्रमात 88 सालची एक जोडी पुन्हा उतरवली होती.

कालिदास कलामंदिरात सर्वात्मक शिवसुंदर, हळूच या, हसरा नाचरा, निरोप, राजा आला, आगगाडी जमीन, सर्वात्मका सर्वेश्‍वरा आदींवर नृत्य सादर करण्यात आले.

याप्रसंगी नाशिक एज्युकेशनचे सुर्यकांत रहाळकर, अ‍ॅड. ओढेकर,बनकर सिक्युरिटीजचे बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परशुराम सायखेडकर मध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे,सागरमल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम, ज्येष्ठ विधिज्ञ नंदकिशोर भुतडा,हे विशेष अतिथी होते. या सोहळ्यास कीर्ती कला मंदिराच्या विद्यार्थिनी आणि पालक यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*