खरीप पेरणीसाठी उपयोगी ठरतील अशा बाबी

0

राज्यात मान्सूनची उत्तम सुरूवात झाली आहे. साहजिक पिकांच्या पेरण्यांसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. त्याच बरोबर शेतकर्‍यांनी पेरणीबाबतची महत्त्वपूर्ण माहितीही लक्षात घ्यायला हवी.

ज्वारी चारा पीक पेरणी
चार्‍याचं पीक म्हणून ज्वारी तीनही हंगामात जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी-मार्च या कालावधीत पेरता येते. पेरणीकरता चांगलं टपोरं, न फुटलेलं, चकाकी युक्त, रोगविरहीत सुधारित वाणांचं बियाणं हेक्टरी 40 किलो वापरावं. पेरणी 25 ते 30 सें.मी. अंतरावर पाभरीच्या सहाय्यानं करावी. चारा म्हणून पेरणीसाठी ज्वारीचे रूचिरा, मालदांडी, पूसाचारी, एम.पी.चारी, फुले अमृता हे वाण प्रसिद्ध आहेत.

बाजरी चारा पीक पेरणी
हिरव्या चार्‍यासाठी बाजरी खरीप आणि उन्हाळी हंगामात पेरावी. खरीप हंगामातील पेरणी जून-जुलै आणि उन्हाळी हंगामातील पेरणी फेब्रुवारी-मार्चमध्ये करावी. हिरव्या चार्‍यासाठी हेक्टरी दहा किलो बियाणं वापरून पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. हिरव्या चार्‍यासाठी खास प्रसारित केलेले वाण उदा. जायंट बाजरा, राजको बाजरा वापरावं. यापासून प्रति हेक्टरी सरासरी 400 ते 450 क्विंटल चारा मिळतो.

तुरीची पेरणी
पाऊस अनियमित पडल्यास पेरणीस उशीर होतो आणि उत्पादनात घट येते. कारण उशीरा पेरलेल्या पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसंच फुलं, शेंगा यांची संख्या कमी राहते आणि उत्पादनात घट येते. म्हणून तुरीची पेरणी वेळेवर म्हणजे मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि वाफसा येताच, जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा या काळात करावी.

मुळ्याची लागवड
राज्यात मुळ्याची लागवड वर्षभर करता येते. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने याची व्यापारी लागवड मात्र रब्बी हंगामात केली जाते. सप्टेंबर ते जानेवारी हा रब्बी हंगामातील कालावधी पेरणीसाठी योग्य असतो. तर खरीप हंगामासाठी जून ते ऑगस्ट आणि उन्हाळी हंगामासाठी मार्च-एप्रिल हा काळ पेरणीसाठी योग्य असतो. मुळ्याची लागवड करतांना दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 8 ते 10 सें.मी. ठेवावं. लागवड सपाटवाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यातील अंतर मुळ्याच्या जातीवर अवलंबून असतं.

LEAVE A REPLY

*