इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अखेरच्या दिवशी झुंबड

0

इगतपुरी । दि ११ प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी झाली होती. त्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने तीन वाजेपर्यंत ठेवली होती.

इगतपुरी तालुक्यातील धारगाव, शिरसाठे, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दाैंडत, उंबरकोन,  सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, नांदगावसदो ह्या १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. टाके घोटी ह्या एकमेव गावासाठी थेट सरपंच पदाची निवडणूक होत आहे.

१५ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात येथे सोय करण्यात आली होती. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांसह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते.

काही ग्रामपंचायतींसाठी विक्रमी अर्ज तर काहींनी भोपळाही फोडला नाही.काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध निश्चित झाली आहे. मात्र, इतर ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. उद्या १२ सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, १५ तारखेला माघार आणि चिन्हवाटप होईल.त्यानंतरच निवडणुकीतील रिंगणातील उमेदवार निश्चित समजणार आहेत.

खरे तर अर्ज दाखल करण्याची मुदत आठ दिवस असताना विरोधकांना आपला राजकीय धोरणाचा थांगपत्ता लागू नये म्हणून आज अनेक अर्ज दाखल झाले. निवडणूक झाल्यास २६ सप्टेंबरला व मतमोजणी २७ सप्टेंबरला होईल.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात व्युव्हरचनेला आजपासून वेग येणार आहे. सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या निवडणुकीत लक्ष घातले असल्याने निवडणूक रंगतदार होईल अशी चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

*