नाशिक : कोरोना टेस्टींग लॅबला मिळाली परवानगी; या आठवड्यापासूनच होणार तपासणी

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित कोरोना टेस्टींग लॅबला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नागपूर कार्यालयाने आज जिल्ह्यातील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय तथा मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये कोरोना तपासणी लॅबला सर्व निकषांवर पूरिपूर्ण ठरल्याबद्दल मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी देशदूतशी बोलताना दिली. नुकतेच मान्यतेचे पत्र प्राप्त झाले असून किट्स उपलब्ध झाल्यानंतर लगेचच कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी याठिकाणी सुरु केली जाणार आहे.

आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना टेस्टिंग लॅब साधारण या आठवड्यातच सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या आठवड्यातच  ‘आयसीएमआर’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये येऊन या लॅबची पाहणी केली होती.

यानंतर आज एम्सकडून ही लॅब सुरु करण्यासाठी परवानगी दिली. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व उपजिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या लॅबची पाहणी केली होती. यानंतर सर्वांच्या प्रयत्नांनी लॅब सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते.

ही लॅब सुरु झाल्यानंतर किती किट्स आपल्याला उपलब्ध होतील. यावरच किती नमुने आपल्याला दरदिवशी टेस्ट करता येईल हे सांगता येणार आहे. महाविद्यालय आता किट्सच्या  उपलब्धतेच्या प्रतीक्षेत आहे.

नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान या संस्थेने आज मंजुरी दिली आहे. ही नाशिककरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे. या लॅबमूळे नाशिकमध्ये जास्तीत जास्त रुग्णांच्या कोविड१९ बाबत तपासणी होऊन अतिशय कमी वेळात अहवाल प्राप्त होतील.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी या लॅबमुळे भरीव मदत होणार आहे.

छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक तथा, मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *