मनमाडमध्ये मुस्लीम युवक गणेशोत्सव मंडळ ‘अध्यक्ष’ तर हिंदू पाच पिढ्यांपासून करतात ‘मोहरम’

0

मनमाड (बब्बू शेख) | ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी है हम! वतन हिंदुस्तान हमारा’ या उक्तींचा आदर्श देणारी घटना मनमाडमध्ये घडली आहे. मनमाडमधील सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष मुस्लीम तरुण आहे.  त्यांच्याकडून जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतानाच शहरातील हिंदू कुटुंबिय भक्तिभावाने मोहरम सण त्यांच्या पाच पिढ्यांपासून साजरा करत आहे.

गणेशोत्सव आणि मोहरम एकाच वेळी आल्यामुळे या घरात गणपती बाप्पा आणि मोहरम असे दोन्ही उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी होत असल्यामुळे सध्या मनमाडमधील या घटनेची चर्चा पंचक्रोशीत चांगलीच रंगली आहे.

पाच पिढ्यांपासून या कुटुंबियात मोहरम निमित्त ताजीये (डोले) बनविले जातात. यंदा तर मोहरम व गणेशोत्सव सोबत आल्याने या कुटुंबियाच्या घरात एकाच वेळी मोहरम व गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे घर जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतिक बनले आहे.

मनमाड शहराच्या शिवाजी चौकातील राजू गायकवाड व त्यांचे कुटुंबिय ब्रिटीश काळापासून राहतात. त्यांना हतगडी नावाने ओळखले जाते. या कुटुंबियात पाच पिढ्यांपासून ताजीये बनवून भक्तिभावाने मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे.

मोहरमचे चंद्रदर्शन होताच गायकवाड कुटुंबिय ताजिया (डोले) बनविण्याच्या कामाला सुरुवात करतात. दरवर्षीप्रमाणे यंदा ही मोहरमचे चंद्रदर्शन होताच त्यांनी ताजिये बनविण्यास सुरुवात केली.

घरातील सर्वजण दहा दिवस परिश्रम करून केवळ ताजीयेच बनवत नाही तर मोहरमच्या सर्व प्रथा देखील काटेकोरपणे पाळतात. यंदा मोहरम व गणेशोत्सव हे दोन्ही सण सोबत आले असल्यामुळे गायकवाड कुटुंबिय एकीकडे मोहरमसाठी ताजीये बनवीत असतानाच घरातील बाप्पांचीदेखील विधिवत पूजा अर्चा ते करतात.

मी जेंव्हा सून म्हणून मनमाडला आली तेंव्हा माझ्या सासूबाईनी मला मोहरम साजरा करण्याबाबत माहिती देतांना सांगितले की, त्यांच्या घराण्यात पांच पिढ्यापासून मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे. या घराण्यातील पूर्वजांनी नवस केला आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या मोहरम निमित्त ताजिया बनवून त्यांची मिरवणूक काढून मोहरम पारंपारिक पद्धतीने साजरा करतील. आज माझ्या सासूबाईनी सांगितल्याप्रमाणे मी व माझे मुले ही परंपरा कायम ठेवून मोहरम साजरा करीत आहोत. मोहरम साजरा करतानाच आम्ही घरात बाप्पाच्या मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना केली असून विधिवत पूजा अर्चा आम्ही दररोज करतो.

रुपाली गायकवाड,  सून

LEAVE A REPLY

*