नाशिकमध्ये झालेला पाऊस पूर्वमोसमी; १७ जूनला होणार आगमन

शहरात दिसली ढगांची दुर्मिल स्क्वेल लाइन

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. १५ : नाशिक शहरासह जिल्हयात बुधवारी (ता. १४) रोजी झालेला जोरदार पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस होता. मोसमी पाऊस नाशिक जिल्ह्यात सुरू व्हायला आणखी तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.

सध्या मोसमी पाऊस पुण्यापर्यंत पोहोचला असून येत्या १७ जूनपर्यंत नाशिकमध्ये मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

काल दीड तासात ९२ मिमी पाऊस होण्याचे कारण म्हणजे क्युमोलोनिंबस ढगांची ‘स्क्वेल लाईन. हा एक हवामानशास्त्रीय परिणाम असून या प्रकारात वादळासोबत थंड ढगांचा (क्युमोलोनिंबस) एक लांबलचक अरुंद पट्टा तयार होतो. ज्या भागात हा पट्टा तयार होतो, तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. साधारणत: रेल्वेच्या डब्यांप्रमाणे हा प्रकार असतो.

रेल्वेचे डबे एकावर एक आदळले तर कसा परिणाम होईल. त्याचप्रमाणे स्क्वेललाईन प्रकारात पाण्याचे भरलेले ढग एकापाठोपाठ एक आदळून रिते होतात आणि जोरात पाऊस पडतो.  बुधवारी नाशिक शहरावर अशा वादळी ढगांचा सुमारे ४० किलोमीटर लांबीचा पट्टा तयार झाला होता.

यासंदर्भात हवामान अभ्यासक आणि भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘देशदूत’ला सांगितले की नाशिकमध्ये वादळी ढगांचा पट्टा अर्थातच स्क्वेललाईन तयार होणे ही घटना नाशिकसाठी दुर्मिळ म्हणावी लागेल.

अशा हवामानशास्त्रीय घटना प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात घडताना दिसतात. त्यामुळे तेथे कमी वेळात जोरात पाऊस पडण्याचे प्रकार सामान्य आहेत.

दरम्यान राज्यात मोसमी पावसाने प्रवेश केला असला तरी सध्या तो पुणे जिल्ह्यापर्यंतच पोहोचला आहे. नाशिकमध्ये मोसमी पावसाचे आगमन व्हायला १७ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

*