Video/Photo : हरतालिका पूजनासाठी महिलांची महादेव मंदिरात गर्दी

0

नाशिक | गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या हरतालिका पूजनासाठी नाशिक जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिरात महिला तसेच तरुणींनी मोठी गर्दी केली आहे. विजयनगर कॉलनी, सोमेश्वर महादेव मंदिर, कपालेश्वर महादेव मंदिरातही महिलांनी सकाळपासून गर्दी केली आहे. याठिकाणी विधिवत पूजा करून महादेवाला तरुणींना आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावा यासाठी प्रार्थना केली.

“हरतालिका` हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करण्यात येते. काही जणी हे व्रत कडक करतात. विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म केले असे अनेक महिला सांगतात.

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला ‘हरतालिका’ असे म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा केली जाते. हरतालिका या शब्दाची फोड ‘हरित’ म्हणजे ‘हरण’ करणे आणि ‘आलिका’ म्हणजे ‘आलिच्या’-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे.

या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते.

धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.

दुकाने फुलली :

नियमित वर्दळीचा भाग असलेल्या रविवार कारंजा परिसरात पत्री तसेच्या हरतालिका पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. उद्यापासून गणेशोत्सव असल्यामुळे विविध प्रकारच्या भाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत. महिलांच्या प्रचंड गर्दीने आज गंगाघाट आणि रविवार कारंजा, मालेगात स्टड परिसर गजबजला आहे.

 

LEAVE A REPLY

*