Video : नाशिकचे रखडलेले प्रकल्प मार्गी निघणार; पालकमंत्र्यांकडून पाहणी

Video : नाशिकचे रखडलेले प्रकल्प मार्गी निघणार; पालकमंत्र्यांकडून पाहणी

नाशिक | प्रतिनिधी  

आघाडी सरकारच्या काळातील पूर्ण केलेली तसेच अंतिम टप्प्यात असलेली कामे गेल्या पाच वर्षाच्या काळात रखडली आहेत.  त्यापैकी गंगापूर येथील मेगा पर्यटन संकुलातील बोटक्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, मनोरंजन पार्क यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्प लवकरच सुरु करण्यात येतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली.

ना. भुजबळ यांनी आज गंगापूर मेगा पर्यटन संकुलातील बोटक्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, मनोरंजन पार्क यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्पाची पाहणी करून सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करावी असे आदेश देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अलका वाघ, कार्यकारी अभियंता सागर शिंदे तसेच पर्यटन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा नियोजन बैठकीत नाशिकच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबत निधीची तरतूद केल्यानंतर आज ना.छगन भुजबळ यांनी गंगापूर येथील मेगा पर्यटन संकुलातील बोटक्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, मनोरंजन पार्क यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने करावयाच्या कामाबाबत आदेश दिले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ना.छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या मेगापर्यटन संकुलातील सद्यस्थितीची पाहणी करण्यात आली आहे. खरतरं मेगा पर्यटन संकुलातील, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, मनोरंजन पार्क सर्व प्रकल्प पूर्ण असतांना तसेच यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्प केवळ १० टक्के काम बाकी असतांना दुर्लक्ष करण्यात आले.

नाशिकच्या बोट क्लबच्या डिझाईनची आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. तसेच परदेशातून नामवंत मासिकांनी याची दखल घेऊन आपल्या फ्रंट पेजवर त्याची दखल घेतली. या बोट क्लब सारख्या प्रकल्पात प्रदूषण विरहीत ४० बोटी या अमेरिकेतून आणल्या गेल्या. मात्र त्यातील काही बोटी या मागच्या सरकारच्या काळात स्थलांतरीत झाल्या.

त्यातील उरलेल्या बोटी येथील लोकांनी सुरक्षितपणे ठेवल्या आहेत. त्याची तपासणी करून त्या उपयोगात आणल्या जातील. तसेच नव्याने काही बोटींची आवश्यकता असेल तर त्या आणल्या जातील. त्यासाठी अनुभवी लोकांची मदत घेतली जाईल आणि बोट क्लबचा प्रकल्प सुरु केला जाईल हा राज्यातला एक नंबरचा बोट क्लब असेल असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, मनोरंजन पार्क हे तयार असलेले प्रकल्प देखील सुरु करण्यात येतील. दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकच्या गोवर्धन येथील कलाग्रामचे काम हे अंतिम टप्यात असून ही सर्व प्रकल्प लवकरच सुरु करण्याचा आमचा मानस आहे. कलाग्रामचे त्यादृष्टीने या प्रकल्पांची साफसफाई तसेच डागडूजीची कामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

हे प्रकल्प सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याठिकाणी पैसा उपलब्ध होणार असून यातून अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे. कलाग्रामच्या माध्यमातून राज्यातील, परराज्यातील तसेच स्थानिकाना आपल्या वस्तू विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजार पेठ उपलब्ध होणार आहे.

तसेच बाहेरून पर्यटनासाठी आलेले पर्यटक हे या मेगापर्यटन संकुलाचा लाभ घेऊन दोन तीन दिवस नाशिकमध्ये वास्तव्य करू शकतील त्यातून नाशिकचे अर्थकारण देखील सुधारेल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यापुढील काळात नाशिकचे पावित्र्य जपून विकास केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com