विनापरवाना ऑनलाईन खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे संकेत

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. १२ : विना परवाना ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ विकणाऱ्या मुंबईतील साडेतीनशे आस्थापनांना (उपाहारगृह, हॉटेल आदी) उपाहारगृहांना नोटीसा बजावण्यात आल्या असून ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे, असे सांगत विनापरवाना ऑनलाईन खाद्य विक्री करणाऱ्या कंपन्यांवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कारवाई संकेत दिले आहेत.

आय नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अलिकडेच नाशिकमध्ये काही हॉटेलचालक आणि ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून घरपोच खाद्यपदार्थ विक्रीला सुरूवात झाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

राज्यातील अन्न आणि औषधी प्रशासन जोमाने कामाला लागले असल्याचे सांगून श्री. बापट पुढे म्हणाले की भेसळ करणाऱ्यांविरोधात कायद्याची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यांना मोक्का लावता येतो का? याचीही चाचपणी करण्यात येत आहे.

येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रेशनकार्डवर एक किलो साखर मिळणार असल्याचे सांगत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री पुढे म्हणाले की आतापर्यंत राज्यातील ९८ टक्के रेशन दुकानांमध्ये पॉस यंत्र बसविले असून प्रत्येक दुकान मंत्रालयाशी जोडले आहे.

यामुळे दहा लाखाच्यावर  बोगस रेशनकार्ड रद्द करता आले असून त्यामुळे ३८५० मे.टन धान्याची बचत झाली आहे.  राज्यात  ८३ टक्के आधार संलग्न करण्यात आले असून नाशिक जिल्ह्यात ६८ टक्के रेशनकार्डधारक आधारशी संलग्न करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. वाटप आणि वितरण व्यवस्था आता समाधानकारण असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार आपल्या दारी ही या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे पूर्वी ज्या सुनावण्या मुंबईत व्हायच्या त्या आता प्रत्येक विभागात होत आहेत.  आतापर्यंत ४ हजार केसेसचा निकाल निवाडा करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बर्फाला लेबल लावून विकण्याची सक्ती करण्यात आली आहे. गुटखा कारवाई संदर्भातील कायद्या बदल करणार असून तो आता अजामिनपात्र गुन्हा होईल यासाठी प्रयत्न असणार आहे. असे सांगून वजन मापे परवानग्या आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत, असेही श्री. बापट यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*