Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात सूर्यकिरणे पोहोचू लागले; ३ ते ४ दिवसच असतो हा दुर्मिळ योग

Share

सिन्नर । येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या थेट गाभार्‍यात सूर्योदयाची किरणे पोहोचू लागली असून सूर्यकिरणांचा हा अनोखा उत्सव डोळ्यात साठवण्यासाठी दोन दिवसांपासून भाविकांची गर्दी होत आहे. अजूनही दोन-तीन दिवस डोळ्यांना दीपवणारा हा उत्सव सुरुच राहणार आहे.

भगवान शंकर व विष्णू यांच्या मिलनाचे प्रतीक असणारे हे गोविंदेश्वर अर्थात गोंदेश्वर मंदिर हेमाडपंथी पंचायतन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी या मंदिराची उभारणी केली आहे. या संपूर्ण मंदिराची उभारणीच हत्ती शिल्पात झाली आहे. शंकराच्या प्रत्येक मंदिरात नंदी असतोच असतो.

मात्र, इथे नंदीला मंदिरात जागा नसून मंदिराच्या समोर पूर्वेला नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. शंकराचे मुख्य मंदिर मध्यावर असून त्याच्याभोवती चार उपदिशांना पाच मंदिरे अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरासमोरील नंदीच्या मंदिरानंतर श्रीगणेश, पार्वती, सूर्य देव व विष्णूचे मंदिर तेथे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदेवाची एक-दोनच मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर इथे आहे. गोंदेश्वरच्या मुख्य मंदिरासह इतर चार मंदिराचाही आकार कुठूनही बघीतला तर हत्तीवर अंबारी ठेवल्याप्रमाणे आपल्याला दिसतो.

मुख्य 125 फूट बाय 95 फुटी या मंदिराची व नंदीच्या मंदिराची रचनाच अशी करण्यात आली आहे की, वर्षातील काही दिवस सूर्योदयाची कोवळी किरणे थेट नंदीच्या मंदिरातून गाभार्‍यातील पिंडीवर अभिषेक करतात. वर्षभर सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायन सुरू असते.

जेव्हा सूर्य मध्यावर येतो, तेव्हा सूर्याची किरणे थेट नंदीच्या मंदिराला चिरत गोंदेश्वर मंदिराच्या सभामंडपातून गाभार्‍याकडे झेपावतात. गाभार्‍याच्या प्रवेशद्वाराच्या उंबर्‍यावरील शिल्पांना अनोखी चकाकी देत गाभार्‍यातील पिंडीवर अभिषेक करतात.

या पिंडीची सावली समोरच्या भिंतीवर पडते, तेव्हाचे अप्रतिम लावण्य बघणार्‍यांना वेड लावते. तीन ते चार मिनिटे सूर्यकिरणांचा हा उत्सव चालतो. डोळ्यांना दीपवणारा हा अनोखा अभिषेक अर्थात किरणोत्सव गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झाला असून सकाळी 6.30 च्या दरम्यान अजूनही तीन-चार दिवस हा अनोखा उत्सव भाविकांना डोळ्यात साठवता येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!