Type to search

नाशिक

के. के. वाघ ‘सुवर्णमहोत्सवी’ वर्षात पदार्पणानिमित्त राबविणार विविध उपक्रम

Share

नाशिक : शिक्षण हा  समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतुने प्रेरित होऊन पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी नाशिक जिल्ह्यात सन 1970 मध्ये के.के.वाघ शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.

के.के.वाघ शिक्षण संस्थेची सुरुवात निफाड तालुक्यात मुलींसाठी शाळा सुरु करुन केली गेली. आता यासंस्थेने आपल्या वाटचालीतील एक मैलाचा टप्पा पार केला आहे. तो टप्पा म्हणजे के. के. वाघ शिक्षणसंस्था येत्या नवीन वर्षात आपल्या शिक्षण क्षेत्रातील योगदानास पन्नासव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने 2019- 20 हे सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून साजरे करत आहेत.

जानेवारी 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मा.बाळासाहेब वाघ यांनी दिली.

यावेळी संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, मुख्य समन्वयक प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, समीर वाघ, अजिंक्य वाघ, समन्वयक सुवर्ण महोत्सव समिती प्रा. एम. बी. झाडे, डॉ. व्ही. एम. सेवलिकर, प्रा. पी . टी कडवे, डॉ. बी. व्ही. कर्डीले, डॉ. बी. जी. वाघ, प्रा. एम. बी. मुरुगकर आणि डॉ. के. एस. जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

समाज आणि राष्ट्राच्या प्रगतिसाठी लावलेला हा शिक्षणचा वेलू आज गगनात झेपावतो आहे. वर्तमान परिस्थितीत के.के.वाघ शिक्षणसंस्था, नाशिक जिल्ह्यातील अग्रेसर व गुणवत्ता पुर्ण शिक्षण प्रदान करणारी संस्था म्हणून उदयास आलेली आहे.

गेल्या 50 वर्षाच्या कालावधीत संस्थेने अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून अभियांत्रिकी, कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या क्षितीजावर गुणवत्तेने परिपुर्ण संस्था असा नावलौकीक मिळविला आहे.

नुकताच केंद्रीय मन्युष्यबळ खात्याने जाहीर केलेला मानांकनात के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाला राज्यात 9 वा तर संपुर्ण देशात 85 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

संस्थेच्या विकासाचा वारू अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित न राहता पांरपारीक शिक्षणाबरोबर ललितकला, शिक्षणशास्त्र, परिचारीका व कृषीविज्ञानाच्या क्षेत्रातही आपली चुणुक दाखवित आजमितीस एकूण 35 वेगवेगळया संस्थाची गरूडझेप घेत विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे.

के. के. वाघ शिक्षण संस्थेने नेहमीच्या चमळ वाटांवरुन चालण्यापेक्षा आपला स्वतःचा एक गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचा नवीन मार्ग प्रशस्त केला आहे. इथे निर्माण होणार्‍या अभियंत्यांना नव-नवीन गुणवतेच्या पैलूनी संस्कारी केले जात आहे. त्यामुळेच सातासमुद्रापार ही के. के. वाघचे विद्यार्थी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकवित आहेत. देश-विदेशात मोठ-मोठी पदे विभूषित करीत संस्था आणि समाजात गौरवपूर्ण योगदान देत आहेत.

के. के. वाघ शिक्षण संस्थेद्वारा ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन, ग्रामीण भागातील हजारो मुलींचा शिक्षणाचा प्रश्न सोडवून, गरीब व मध्यमवर्गीयांचे जीवनमान ऊंचावण्याचा सतत प्रयत्न  केला  जात आहे.

याच  सामाजिक बांधिलकीतून सहा विविध कृषीमहाविद्यालये  निर्माण करुन महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषीशिक्षण प्रदान करणारी संस्था म्हणून, के. के.  वाघ शिक्षण संस्था नावारुपाला आली आहे.

याशिवाय ललित कला (फाईऩआर्ट्स) व प्रयोगजिवी कला  (परफार्मिंगआर्ट्स) यासारखी महाविद्यालये स्थापन करुन भारतीय परंपरा आणि अभिजात कलांची जोपासऩा करत आहे.

सी. बी. एस. ई. शिक्षण प्रणालीच्या शाळा सुरू करून संस्थेने अद्ययावत शिक्षणव्यवस्थेचा पुरस्कार केलेला असतांनाच गेल्या शैक्षणिक वर्षापासून संस्थेने नाशिक येथे बी.फार्मसी तर चांदोरी येथे डी. फार्मसी महाविद्यालये सुरू करून वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात नवीन हस्ताक्षर केले आहे.

या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालये आणि हॉस्टेल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सुवर्ण महोत्सवाचा मुख्य सोहळा संस्थेच्या हिराबाई हरिदास विद्यानगरी,  अमृतधाम, पंचवटी, नाशिक येथे सोमवार (दि.७) जानेवारी पासून सुरु होणार आहे.

त्याच दिवशी अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पस मध्ये सकाळी 10 वाजता संस्थेचे विश्वस्त  अशोक भाई मर्चंट यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यनारायण महापुजा करण्यात येणार आहे.

तसेच, 24 जानेवारीस महाकवी कालिदास कलामंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी दर्जेदार कलात्मक अविष्कार सादर करतील.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुवर्ण महोत्सव प्रोजेक्ट रॅली काढण्यात येणार आहे. त्यात संस्थेच्या विविध महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणारे सामाजिक प्रोजेक्ट तसेच, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट्स सादर केले जातील.

फेब्रुवारी महिन्यात कवी संमेलन आणि तीनही तंत्रनिकेतन मध्ये रक्तदान शिबीर ठेवण्यात आले आहे.  8 मार्चला‘ आंतरराष्ट्रीय महिलादिन’, के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालय आणि शाळांमध्ये साजरा केला जाणार आहे.

सालाबादाप्रमाणे यंदाही कर्मवीर एक्स्पो (वर्किंग मॉडेल स्पर्धा) मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिक कलाकार (प्रोफेशनल आर्टिस्ट) यांचे गेट टूगेदर ठेवण्यात येणार आहे.

एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात होण्याच्या अनुषंगाने विविध कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

मे महिन्यात ग्रामीण भागातील तीनही वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे. प्रत्येक महाविद्यालयात 5 जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जाईल. त्याचप्रमाणे 21 जूनला‘ आंतरराष्ट्रीय योगदिन ’साजरा केला जाणार आहे.

जून महिन्यात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येईल. 1 जुलैस वृक्षरोपण आणि 7 ते 22 जुलै दरम्यान, सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, 22 जुलैस कर्मवीर दिन साजरा केला जाईल. यामध्ये के. के. वाघ शिक्षण संस्था आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने काकासाहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात.

तर यंदा सुवर्ण महोत्सवानिमित्त या स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात येतील. ऑगस्ट मध्ये इकोफ्रेन्डली गणेशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाडुच्या मातीच्या गणेशमुर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच, याच महिन्यात पेंटिंग आणि शिल्पकला स्पर्धा ठेवण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात गणेश फेस्टीवल आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जाईल.  2 ऑक्टोबर ला महात्मा गांधी जयंती निमित्त प्रत्येक महाविद्यालयात, तंत्रनिकेतन आणि शाळांमध्ये स्वच्छता अभियान स्वतंत्ररित्या राबविण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जाणार आहे.

नोव्हेंबरमध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर, पोस्टर आणि फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. सुवर्ण महोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 मध्ये अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि इतर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी मेळावा ठेवण्यात आला आहे.

याच महिन्यात संस्थेच्या विविध महाविदयालयाच्या प्रांगणात पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, कब्बडी, कुस्ती, फूटबॉल, बुद्धीबळ, जंम्परोप आणि तलवारबाजी इत्यादी क्रीडा स्पर्धांचे आयोजन  करण्यात येतात.

तंत्रनिकेतनच्या वतीने डिसेंबर 2019 मध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. रानवड येथे शेतकरी मेळावा, निफाड तालुक्यातील पी. एच. डी धारक आणि शहीद सैनिक कुटूंबियांचा सत्कार केला जाणार आहे.

तसेच, सुवर्ण महोत्सवी वर्षात संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रत्येक महिन्यात क्रमा-क्रमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

उल्लेखनिय बाब म्हणजे, निफाड तालुक्यातील कर्तुत्वान महिलांचा सत्कार देखील केला जाणार आहे. संगीत / नृत्य/ नाट्य क्षेत्रातील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 च्या दरम्यान, कर्मयोगी आणि कृषी तपस्वी पुरस्काराने सुवर्ण महोत्सवाची सांगता होणार आहे.

के.के.वाघ संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त होणार्या या विविध उपक्रमांमध्ये नाशिककर नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!