विश्रामगड मोहीमेची ‘गरुडझेप’

0

नाशिक | प्रतिनिधी 

शहरातील गरुडझेप प्रतिष्ठानकडून शिवकालीन इगतपुरी तालुक्यातील विश्रामगड किल्ला सर करत येथील किल्ल्याची साफसफाई केली. प्रतिष्ठानकडून सध्या नाशिकमधील अनेक किल्ल्यांची सर करून साफसफाई केली जात आहे.

सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत.

अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी महीनाभर विश्रांती घेतल्यामुळे किल्ल्याचे दुसरे नाव ‘विश्रामगड’ असे देखील आहे.

श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात अवंध व पट्टा किल्ल्य़ांचा उल्लेख आढळतो. रावणाचा छेदिला आंगोठा, तेथे झाला औंढापट्टा, त्रिंबकीच्या बिकटघाटा, अवंढा-पट्टा प्रसिध्द !!

वन खात्याने वरती जाण्यासाठी पायऱ्या तयार केल्या आहेत. काही अंतर चढाई केल्यावर विश्रांतीसाठी पत्र्याचे शेडदेखील आहेत.

वाटेवर खूप मोठ्या प्रमाणात माकडे बघावयास मिळतात. वरती लक्ष्मण बाबा यांची समाधी आहे. १०–१२ पाण्याचे टाके आहेत.

टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा पट्टा देवीचे मंदिर लागते. या मंदिराचा अलीकडेच जीर्णोध्दार केलेला आहे. मंदिरा समोरून पुढे जाउन उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला ‘अंबरखाना’ म्हणतात.

या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. अंबरखान्याची वनखात्याने डागडुजी केलेली असून आत मधे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. अंबरखान्याभोवती बगीचा फ़ुलवलेला आहे.

गरुडझेप प्रतिष्ठानचे डॉ. संदीप भानोसे, रतन भावसार, संकेत भानोसे, सागर बोडके, मानसी जोशी, वैशाली कुलथे शाम कुलथे, चेतन कुलथे, निशिगंध, बाल दुर्ग्संवार्धक रेवा, सुरज कुमावत, निशांत शिरसाट, सोमनाथ कांगणे उपस्थित होते.

सर्वांनी मिळून गडावरील प्लास्टिक गोळा केले. तसेच डॉ. संदीप भानोसे यांनी शाळेतील आलेल्या सहलीतील मुलांना गडकोट संवर्धांचे महत्व सांगत प्रबोधन केले.

असा आहे इतिहास 

चौदाव्या शतकात पट्टा किल्ला बहामनी साम्राज्यात असल्याचे उल्लेख आढळतात. इ. स. १४९० मध्ये बहामनी साम्राज्याची शकले झाल्यावर हा किल्ला निजामशाहीत गेला. इ.स. १६२७ मधे मुगलांनी हा किल्ला निजामाकडुन जिंकून घेतला. इ. स. १६७१ मध्ये मोरोपंतानी हा किल्ला जिकूंन स्वराज्यात दाखल केला. १६७२ मध्ये मोगलांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. इ. स. १६७५ मध्ये मोरोपंत पिंगळ्यांनी पट्टगड परत स्वराज्यात आणला.

LEAVE A REPLY

*