Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गणेशमूर्ती गाळ्यांना कोणी नाही वाली; सहा विभागात अवघ्या २२ गाळ्यांचा लिलाव

Share

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेकडून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी असलेले गणेशमूर्ती गाळे वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने रद्द केल्यानंतर आता गणेशमूर्ती विक्रेत्यांनी महापालिका गाळ्यांकडे पाठ फिरवल्याचे सलग दुसर्‍या वर्षी दिसून आले. महापालिका कर विभागाकडून आज (दि.21) शहरातील सहा विभागांतील 543 गाळ्यांचा लिलाव प्रक्रिया राबवली. यातील केवळ 22 गाळ्यांचा लिलाव होऊ शकला. अशाप्रकारे गणेशमूर्ती विक्रेत्यांनी खासगी जागांना प्राधान्य दिल्यामुळे 521 गाळ्यांचा लिलाव होऊ शकला नाही. यामुळे गाळ्यांच्या माध्यमातून मिळणार्‍या महसुलात सलग दुसर्‍या वर्षी घट झाली आहे.

शहरातील दहा-पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेकडून नेहरु उद्यानाच्या परिसर व सांगली बँक सिग्नल याठिकाणी गणेशमूर्ती विक्री गाळे लावले जात होते. याठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर हेच गाळे पुढे जिल्हा रुग्णालयाच्या समोर त्र्यंबकरोडच्या दोन्ही बाजूस लावले गेले.

याठिकाणी देखील वाहतुकीला अडथळा होऊ लागल्यानंतर अलीकडेच येथील गाळे गोल्फ क्लब मैदानावर हलविण्यात आले. अशाप्रकारे बदल झाल्यानंतर शहरातील गणेशमूर्ती विक्रेत्यांनी महापालिकेच्या गाळ्यांकडे पाठ फिरवली असून त्यांच्याकडून शहरातील खासगी जागेवरील गाळ्यांना प्राधान्य देण्याचे काम झाले.

यात मागील वर्षी महापालिकेचे केवळ 13 गाळेच लिलावात गेले होते. त्यानंतर शिल्लक गाळ्यांसाठी अगोदर येणार्‍यास प्राधान्य यानुसार काही गाळे नंतर विक्रेत्यांनी घेतले. याच पार्श्वभूमीवर आज कर विभागाकडून शहरातील 543 गाळ्यांचा लिलाव आज राजीव गांधीभवन मुख्यालयात घेण्यात आले. यात केवळ 22 गाळेच लिलावात गेले. शिल्लक 521 गाळ्यांना प्रतिसादच मिळाला नाही.

आज झालेल्या लिलावात सरकारी किंमत 3550 रुपये ते 3700 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. यात 22 गाळ्यांच्या लिलावाला बोली लागून हे गाळे बोली लावणार्‍यांना देण्यात आले. यात जास्तीत जास्त बोलीव 3950 रुपयापर्यंत गेली. तर कमीत कमी बोली 3700 रुपयांंपर्यंत गेली.

अशाप्रकारे झालेल्या लिलाव प्रक्रियेत नाशिक पूर्व विभागातील 15 पैकी 5 , नाशिक पश्चिम विभागातील 142 पैकी 0, पंचवटी विभागातील 34 पैकी 12 गाळे, नविन नाशिक विभागातील 28 पैकी 8 गाळे, नाशिकरोड विभागातील 265 पैकी 0 आणि सातपूर विभागातील 50 पैकी 0 अशाप्रकारे गाळ्याचे लिलाव झाले आहे. महापालिकेकडून शहरातील हे गणेशमूर्ती विक्री गाळे 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2019 अशा पाच दिवसांच्या कालावधीकरिता देण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!