Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर चार गावे सील; आठ हजार लोकसंख्येचे होणार सर्व्हेक्षण

Share

सिन्नर | वार्ताहर 

तालुक्यात करोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. वावी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या पाथरे (वारेगाव) येथील सदर रुग्णाने त्याची पत्नी व मुलासोबत मालेगाव येथे दोन वेळा दुचाकीवरून प्रवास करण्याचे निष्पन्न झाले आहे.

आज (दि.13) पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या या रुग्णासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांना दोन दिवसांपूर्वीच आरोग्य यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने नाशिक येथील महानगरपालिकेच्या डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयातील करोना विलीगिकरण कक्षात दाखल केले होते. या ठिकाणी केलेल्या तपासणीअंती कुटुंब प्रमुख असलेल्या 65 वर्षीय पुरुषास करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या आठवड्यात 4 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी सदर रुग्ण त्याची पत्नी व मुलगा यांच्यासमवेत दुचाकीवरून मालेगाव येथे गेले होते. तेथे त्यांनी दोन्ही वेळेस मुक्काम केला होता. या प्रवासाबद्दल त्यांनी परत आल्यावर ग्रामस्थांना माहिती दिली नाही. तथापी त्यांच्या या प्रवासाबद्दल संशय व्यक्त करत पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, व वारेगाव येथील ग्रामस्थांनी आरोग्य विभाग आणि पोलीस ठाण्यात कळवले होते. त्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून त्यांना तपासणीचा सल्ला देण्यात आला. मात्र , आम्ही मालेगाव नाही तर येवला येथे गेल्याचे वारंवार सांगत त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला होता.

दरम्यान, पोलिस यंत्रणेकडून त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आल्यावर ते वरील तारखांना वारेगाव येथून मालेगाव येथेच गेल्याचे उघड झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी दि. 11 एप्रिल रोजी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याच्या फिर्यादी वरून वावी पोलीस ठाण्यात त्या तिघांच्या विरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित कुटुंबातील सहा जणांना नाशिक येथे करोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या कुटुंबातील इतर पाच जणांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत


तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित घोषीत

सिन्नरच्या पूर्व भागातील 65 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्या आदेशानुसार सदर गावातील 3 किलोमीटर पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून आरोग्य विभागामार्फत या क्षेत्राचे सर्वेक्षण व तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणी कामी 30 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तपासणी दरम्यान, क्लोज कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात तपासणी कामी पाठवण्यात येणार आहे. तसेच संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना आगासखिड येथे उभारण्यात आलेल्या अलगीकरण केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.


पाथरेसह चार गावे सील

करोना बाधित असलेल्या रुग्णाच्या वास्तव्याच्या गावासह परिसरातील पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, कोळगाव माळ ही तीन गावे प्रशासनाने सील केली आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावांकडे येणारे सर्व रस्ते रहदारीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. प्रांताधिकारी डॉ. पठारे, तहसीलदार कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, संबंधित गावातील सरपंच यांच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात आली. या चार गावांमधील 1505 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यात 8264 लोकसंख्येचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!