नाशिकमधील ४२ फुट उंचीचा चारमुखी महाकाय अण्णा गणपती

0
नाशिक (आशा ठुबे) | महाराष्ट्राला अनेक मंदिरांचा, देवी देवतांचा, संत परंपरांचा वारसा लाभला आहे. त्यामुळेच नवीन नवीन वास्तू सगळीकडे बघायला मिळतात. त्यातीलच एक अविस्मरणीय वास्तू म्हणजे नाशिक पावन नगरीतील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपिठ होय.

दत्तयोगी श्री अण्णा गुरुजी महाराज यांना विहितगाव येथील वालदेवी नदीतिरी ब्रम्हमुहूर्तावर ईश्वरी साक्षात्कार झाला आणि त्याच ठिकाणी अण्णा गणपतीची स्थापना २६ जानेवारी २०१२ साली गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर झाली. अण्णा गणपती हे स्थळ नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून दोन ते अडीच किलोमीटरवर आहे. याठिकाणी भारतातील सर्वात उंच ४२ फूट चारमुखी गणपतीची मूर्ती तिथे साकारण्यात आली आहे.

त्याच बरोबर याठिकाणी शिव परिवार साकारण्यात आला आहे. ज्यामध्ये माता चामुंडेश्वरी, श्री रुद्राक्ष महादेव ज्यांना सव्वा कोटी रुद्राक्षांवर स्थापित केलेले असून सव्वा लाख लिटर दुधाने अभिषेक घालून आजही ते रुद्राक्ष भाविकांना प्रसाद रूपाने वाटले जातात.

याचबरोबर गणेशाचे मोठे बंधू कार्तिक स्वामी, श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराज सुध्दा विराजमान आहेत. नागदेवता अनंता आणि वासुकी येथे वास्तूंच्या रक्षण हेतूने साकारण्यात आले आहे. नवग्रहांविषयी प्राचीन काळापासून अशी धारणा आहे की, ब्रम्हांडातील ग्रह आणि नक्षत्र मानवी जीवनावर प्रभाव पाडतात.

हिंदू संस्कृती नुसार कोणत्याही माणसाचं भाग्य निर्धारित करण्यामागे नवग्रहांची प्रमुख शक्ती असते, आणि यावर अण्णा गुरुजींचा दृढ विश्वास आहे. हे शास्त्र मानवी जीवन आणि विश्व यांना जोडणारा महत्वपूर्ण घटक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

सगळ्यांना भौतिक आणि अध्यात्मिक विकासासाठी व आनंदमय जीवनासाठी नवग्रह सिद्धपीठाची स्थापना करण्याचा संकल्प अण्णा गुरुजींनी केला होता आणि त्यानी तो साकार सुद्धा केला. त्यांनी साकारलेला श्री अण्णा गणपती सिद्धपीठ हे उत्तर भारतातील एकमेव नवग्रह सिद्धपीठ आहे.

सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू केतू यांना नवग्रह म्हणून संबोधले जाते. हे सर्व ग्रह एकटे किंवा मिळून मानवी जीवनावर प्रभाव पडत असतात आणि याच कारणामुळे जीवन सुखमय आणि शांतीमय करण्याचा अंतिम उद्देश या सिद्धपिठाचा आहे.

अण्णा गणपतीच्या मंदिर परिसरामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे लावण्यात आलेली आहेत ज्यामुळे तेथील वातावरण नेहमी प्रसन्न राहते, आणि मनाला शांती मिळते. असे म्हटले जाते की, याठिकाणी येणारा प्रत्येक भाविक हा मन प्रसन्न करूनच बाहेर पडतो.

विशेष म्हणजे प्रत्येक नवग्रहाच्या मंदिराबाहेर त्याग्रहाच्या शांतीसाठी काय काय केलं पाहिजे याची पाटी लावण्यात आली आहे आणि प्रत्येक ग्रहाला प्रदक्षिणा घातली जाईल या पद्धतीने मंदिरांची रचना करण्यात आली आहे. गणपतीच्या भव्य मूर्ती समोर चांदीचा मुषक साकारण्यात आला आहे, जो त्या मूर्तीला शोभून दिसतो. मंदिराच्या संपूर्ण आवारामध्ये ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहेत. ज्यामुळे भाविकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होते.

हे मागील सहा वर्षांपासून अण्णा गणपतीच्या सेवेमध्ये रुजू आहेत. त्यांना या सहा वर्षांमध्ये खूप चांगला अनुभव आला. अनेक प्रकारचे भक्तगण त्यांनी बघितले गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकाला प्रसन्न आणि आनंदी होऊन जातांना बघितलं. ते मदिराच्या सेवेत आहेत हे त्यांचं भाग्य असल्याचे ते समजतात.

यशवंत मोरे ( अण्णा गणपती मंदिर कर्मचारी)

मला मंदिरात गेल्यानंतर एक सुखद अनुभव आला. कधी न बघितलेल्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती तिथे बघायला मिळाल्या खूप छान वाटलं.

भूषण गायकवाड (भाविक)

पहिल्या वेळी जेव्हा गणपती बघितला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं कारण एवढी मोठी गणेशाची मूर्ती कुठेच नाहीये. नंतर मध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिरांजवळची सगळी व्यवस्था बघून खूप बरं वाटलं.

स्वाती कोठुळे (भाविक)

LEAVE A REPLY

*