Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विसर्ग घटला : महापूर ओसरला चांदोरी पूर्वपदावर, सायखेडयात अजूनही पाणी

Share

नाशिक । प्रतिनिधी

गोदामाईने रौद्र रुप धारण केल्यानंतर रविवारी (दि.4) आलेला महापूर धरणातून होणारा विसर्ग घटल्याने ओसरायला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.5) सकाळी पुराचे पाणी नारोशंकराच्या घंटेखाली उतरले होते. गंगापूर धरणातून दुपारनंतर 18 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु होता.विसर्गात सातत्याने घट झाल्याने पूर पातळी सांयकाळपर्यंत हळूहळू घटली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पुराचे पाणी उतरले होते.

2008 नंतर तब्बल 11 वर्षांनी गोदावरीला महापूर आला होता. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरु होती. एका दिवसात तब्बल चारशेहून अधिक मिली मीटर इतका पाऊस पडला. तसेच नाशिक शहरातील ही शंभर मिली मीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे गोदेच्या पातळीत सातत्याने वाढ होत होती.

रविवारी गंगापूर धरणातून 46 हजार क्यूसेक इतक्या प्रचंड वेगाने विसर्ग सुरु होता. होळकर पूलाखाली 86 हजार क्यूसेकने गोदेच्या पाण्यात भर पडत होती. परिणामी गोदेला महापूर आला होता. रामसेतू पूल, दुतोंडया मारुतीसह महापूराचे निशाण असलेली नारोशंकाराची घंटा पाण्यात बुडाली होती. होळकर पूलाखाली गोदेने धोक्याची पातळी गांठली होती. मात्र, सोमवारी सकाळपासून गोदेची पाणी पातळी घटण्यास सुरुवात झाली. रोजच्या तुलनेत त्र्यंबकमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होता. नाशिकमध्येही पावसाची रिपरिप सुरु होती. परिणामी गंगापूर धरणातून होणार्‍या विसर्गात मोठी घट झाली. सकाळी विसर्ग 25 हजारावर आला. त्यामुळे पाणी पातळीत घट होऊन नारोशंकराच्या घंटेचे दर्शन झाले. दुपारनंतर विसर्ग 18 हजार तर सांयंकाळी हे प्रमाण 12 हजारांवर आले. त्यामुळे महापूर हळूहळू ओसरत होता. रात्री उशीरा दुतोंडया मारुतीच्या मुखाचे दर्शन झाले. तसेच नदीकाठच्या रहिवाशी परिसरात शिरलेले पाणी देखील कमी होत गेले.

प्रचंड गाळ व घाण
महापूरामुळे मोठ्या प्रमाणात चिखल व घाण वाहून आली. पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहून आलेल्या घाणीचे साम्राज्य पहायला मिळत आहे. मोठया प्रमाणात गवत, गाळ, प्लास्टीक, शेवाळ, पाणवेली ठिकठिकाणी मंदिरे, इमारती, पूल येथे साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

जीवन हळूहळू पूर्वपदावर
महापूरामुळे गोदाकाठी असलेली चांदोरी व सायखेडा ही गावे पाण्यात गेली होती. सोमवारी (दि.5) पूर ओसराला लागल्यावर या गावातील पाणी कमी झाले. चांदोरीत हळूहळू जीवन पूर्वपदावर येत होते. मात्र, सायखेड्यात अजूनही पाण्यात असून जनजीवन सामन्य व्हायला लागणार आहे.

गंगापूर धरण विसर्ग
स.7 18 हजार 909
स.9 18 हजार 909
दु.12 20 हजार 331
साय.7 12 हजार 555

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!