Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांत प्रायोगिक तत्वावर कोविड सेंटर सुरू; रुग्णावर होणार गावातच...

नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांत प्रायोगिक तत्वावर कोविड सेंटर सुरू; रुग्णावर होणार गावातच उपचार

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची घटना व्यवस्थापक म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नियुक्ती केली आहे. करोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कृती आराखडा तयार केला आहे.प्रायोगिक पातळीवर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. हे पाच तालुके कोणकोणते आहेत याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

करोना सदृश्य रुग्ण आढळल्यास त्याच्यावर गावातच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेआठ हजार संभाव्य रुग्ण या सेंटरमध्ये दाखल होण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक गावातील शाळा, वसतिगृह व खासगी रुग्णालये त्यासाठी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू करण्यात अाले आहे.

जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सव्वाशेच्या पुढे पोहोचली असून, त्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावचे आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी, केंद्र सरकारने आगामी काळात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा टप्पा असल्याचे कळविले आहे. त्यामुळे शहरी भागातील लोण ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचू नये, यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्याची उपलब्ध असलेली साधनसामुग्री, मनुष्यबळ, औषधांचा साठा लक्षात घेता तीन टप्प्यात करोनाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने घटना व्यवस्थापक बनसोड यांनी कृती आराखडा तयार केला आहे. प्राथमिक पातळीवर प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी पहिल्या टप्प्यात ५६ गावांची निवडही करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये गावातील कोणत्याही व्यक्तीस करोनासदृश आजाराचे लक्षण दिसल्यास त्याच ठिकाणी वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. येथेच त्याचा स्वॅब घेण्यात येऊन तो तपासणीसाठी पुढे पाठविला जाणार आहे.

रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्याला एक तर होम क्वारंटाइन किंवा इन्स्टिट्यूट क्वारंटाइन केले जाईल. त्यावर पुढील चौदा दिवस देखरेख ठेवण्यात येईल. मात्र,अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला याच केअर सेंटरमध्ये स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे.

या केअर सेंटरसाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व सेवकांची नेमणूक करण्यात आली असून, याशिवाय जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेच्या अख्यत्यारितील आरोग्य सेवाही सज्ज ठेवल्या आहे. जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात आठ हजार ४७० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्याचीही तयारी

दुसऱ्या टप्प्यात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून, त्यात करोनाबाधित, परंतु प्रकृतीला फारसा धोका नसलेल्या रुग्णाला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. यासाठी नाशिक व मालेगाव महापालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीत असलेल्या खासगी व शासकीय दवाखाने तयार ठेवण्यात आली आहे. डेडिकेटेड हेल्थ सेंटरसाठी ७७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या