Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : नारायणगाव येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गेल्या चार दिवसांत चार शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांनी नाशिक हादरले

Share
चामरलेणीला युवकाचा मृतदेह आढळला latest-news-nashik-found-body-of-young-man-at-chamarleni

मनमाड | वार्ताहर 

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र पुन्हा सुरू झाले असून परतीच्या पावसामुळे पिकांची झालेली नासाडी व डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोझ्याला वैतागून गेल्या आठवड्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतांनाच आज मनमाडपासून जवळ असलेल्या नारायणगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

किरण उगले असे या शेतकऱयाचे नाव आहे. 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या 4 दिवसात 4 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून जीवन यात्रा संपविल्यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात 31 ऑक्टोबर रोजी मालेगावच्या कोठारे येथील मोठाभाऊ देवरे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. त्याच दिवशी दिंडोरीच्या मोहाडी येथे संजय देशमुख या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले.

त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी मालेगावच्या रोझे येथील भास्कर घुगे तर आज 4 नोव्हेंबर रोजी मनमाडच्या नारायणगाव येथील  किरण उगले या शेतकऱ्याने आत्महत्त्या केली आहे.

4 दिवसात 4 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपविले आहे. या अगोदर दुष्काळी परिस्थितीला त्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करीत होते, आता अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व डोक्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या सर्वांसाठी चिंतेचा विषय असून शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करून धीर द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!