Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : सत्तानाट्याचा शेतकऱ्यांना संताप; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे राजू शेट्टींकडून सांत्वन

Share

चिंचखेड | वार्ताहर

अचानक झालेल्या परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. सिन्नर, नाशिक, निफाड, दिंडोरी, कळवण, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला या तालुक्यात शेट्टी यांचा दोन दिवसीय दौरा आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजता राजू शेट्टी यांनी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या चिंचखेड येथील आत्महत्या केलेल्या दत्तात्रय देवराम संधान या शेतकऱ्याच्या कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले.

चिंचखेड येथील नारायण संधान यांचा दोन एकर द्राक्ष बाग अवकाळी पावसाने पूर्ण उध्वस्त झालेला आहे या द्राक्ष बागेची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांना शेती पिकांच्या बाबतीत आर्थिक आणि नैसर्गिक झळ सोसावी लागत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस गारपिटीने शेतकरी उध्वस्त होत चाललेला आहे.

विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी उध्वस्त होत चाललेला आहे. शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे ते न भरून निघणारे नुकसान आहे, अशा परिस्थितीत नाशिक सह महाराष्ट्रातील शेतकरी कोलमडून पडलेला आहे.

अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना अद्याप पर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ज्यांनी आधार द्यायचा तेच मुंबईमध्ये राजकारणाचा खेळ करत व्यस्त आहे असा टोला नाव न घेता भाजप शिवसेनेवर राजू शेट्टी यांनी लगावला.

यावेळी राजू शेट्टी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, राज्य कार्यकारणी सदस्य साहेबराव मोरे, पक्षाचे जिल्हा सचिव संपत जाधव, दिंडोरी तालुकाध्यक्ष सचिन कड, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,परिसरातील शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्या पद्धतीने महापुराच्या काळामध्ये शासन निर्णय झाला की महापुरामधील जे बाधित क्षेत्र आहे त्या पिकावर काढलेले कर्ज हे पूर्णपणे माफ केलं गेलं आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलेल नाही त्यांना एनडीआरएफ तिप्पट भरपाई द्यायची असा जो ऑगस्ट महिन्यात शासन निर्णय सरकारने केलेला आहे त्याची व्याप्ती वाढवून पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.

त्याबाधित पिकावर असलेले पीककर्ज पूर्णपणे माफ केल पाहिजे तरच कुठेतरी शेतकरी उभा राहू शकतो हीच मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संघर्ष चालूच राहील. त्यासाठी लवकरात लवकर सरकार अस्तित्वात आले पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!