Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शेततळ्यांचा खर्च मातीत; शेतकरी हवालदिल

Share
शिवडे । वार्ताहर 
सातत्याने खालावणाऱ्या भूजलपातळीवर उपाय म्हणून विहिरी, बोअरवेलच्या भरवश्यावर न  राहता शेतकऱ्यांनी शेततळ्याचा पर्याय अवलंबला आहे. लाखो लिटर पाण्याचा साठा शेततळ्यांमध्ये करून पीकव्यवस्थापनचे उत्कृष्ट तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केले असून टंचाईच्या काळात तळ्यातील साठवलेले पाणी शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहे. मात्र गेल्या वर्षांत पर्जन्यमान घसरल्याने शेततळ्यात पाणी आणायचे कुठून या प्रश्नाने बळीराजाला भेडसावले आहे.
पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे पावसाचे माहेरघर असणाऱ्या शिवडे परिसरातील बहुसंख्य शेततळी कोरडीठाक असून उन्हाच्या चटक्याने या तळ्यांमध्ये आच्छादनासाठी वापरलेला प्लास्टिकचा कागद विरायला सुरुवात झाली आहे. या तळ्यांमध्ये आता पाणी साठवले तर गळक्या आच्छादनामुळे ते रिकामेच राहणार असून कागदासह तळ्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च मातीत गेला आहे.
शिवडे परिसरात दिवाळीनंतर नेहमी जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेततळी बनवली आहेत. या तळ्यांच्या खोदाईपासून प्लास्टिक कागदाच्या आच्छादनापर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास १० लाखांपर्यंतचा खर्च केलेला आहे. याच तळ्यांच्या भरवश्यावर परिसरातील फळबागा उन्हाळ्यात जिवंत राहिल्या असून भाजीपाला पिकांचे नियोजन देखील यापूर्वीच्या काळात करण्यात आले आहे.
यंदा मात्र परिसरातील शेतकऱ्यांवर संक्रांत ओढवली असून शेततळ्यांमध्ये साठवायला पाणीच नसल्याने उघडा पडलेला कागदात उन्हामुळे विरायला सुरुवात झाली आहे. परिणामी कागदासाठीचा लाखोंचा खर्च देखील मातीत गेला आहे. साधारणपणे ३३ बाय ३३ आकाराचे शेततळे खोदायला, त्यात कागत टाकायला, बाजूने संरक्षक कुंपण बांधायला ५ ते ७ लाख खर्च येतो.
हेच तळे वापरात नसलेल्या टँक जागेत खोदले तर खर्च  १० लाखांच्या  पोहोचतो. शिवडे परिसरात बागायती क्षेत्र बघता बहुतेक तळी कठीण जागेवर खोदण्यात  आली आहेत. आच्छादनाच्या कागदाचे आयुर्मान साधारणपणे ५ वर्षे  असते. हा कागद बनवणाऱ्या कंपन्यादेखील तेवढयाच कालावधीची वॉरंटी देतात. मात्र तळ्यात सतत पाणी भरलेले  पाहिजे अशी अट देखील घालण्यात येते.
आता दुष्काळाच्या झळांमध्ये प्यायला घोटभर पाणी मिळायचे वांधे आहेत तिथे तळे कुठून भरणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी पाणी पातळी  गेलेल्या किंवा  शेततळ्यांमधील कागदाचे नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे. पुढच्या खेपेला हा कागद बदलला नाही तर तळ्यात पाणीच साठवता येणार नसल्याने पुन्हा तीन ते पाच लाखांपर्यंत भूर्दंड बसणार आहे.
बागायती असणाऱ्या शिवडेच्या शेतकऱ्यांना टंचाईचा फटका बसला असून उर्वरित तालुक्यात परिस्थिती अजूनच गंभीर आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती केली असून बाहेरून पाणी आणून या तळ्यांमध्ये साठवले आहे. त्यावर  डाळिंबबाग गेल्या  अनेक वर्षांपासून जगवल्या जात आहेत. यंदा पूर्वेच्या गावांतील परिस्थिती गंभीर असून तेथे देखील शेततळ्यांमुळे शेतकऱ्यानं मोठा आर्थिक फटका  करावा लागणार आहे.
कागदाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
शेततळ्यासाठी २०० ते ५०० मायक्रॉन जाडीचा प्लास्टिक कागद वापरला जातो. अनेक नामंकित तसेच लोकल कंपन्या आपल्या मार्केटिंग जाळ्यातून शेतकऱ्यांना हेरतात. आपला कागद कसा योग्य हे पटवून देतात. आणि शेतकरीही देखील घरापर्यंत कंपनीवाला आला असल्याने सहजपणे कागद विकत घेतो. मात्र ५ वर्षांची वॉरंटी असताना तीन वर्षांतच हा कागद खराब होण्याची उदाहरणे असून पाणी नसल्याने तळ्यात कागद उघडा राहिल्याचे  कारण सांगून हात वर केले जातात. शेततळे खोदकाम व कागदासाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र अशा पद्धतीने नुकसान होणार असेल तर कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न शेतकरी  उपस्थित करीत आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!