Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माजी महापौरांना पुन्हा आमदारकीचे डोहाळे!

Share

नाशिक । प्रतिनिधी

आचारसंहितेची तुतारी फुंकण्यात आली असून राजकीय सनई चौघडे वाजू लागले आहेत. अनेकांना आमदारकीचे स्वप्न पडत आहेत. त्यात शहराच्या माजी महापौरांना देखील पुन्हा एकदा आमदारकीचे डोहाळे लागले नसते तर नवलच! या अगोदर नाशिककरांच्या आशीर्वादाने माजी महापौर उत्तमराव ढिकले, डॉ. शोभा बच्छाव, वसंत गिते व बाळासाहेब सानप यांंनी विधानसभेची वारी केली. आता पुन्हा एकदा हे माजी महापौर विधानसभेवर स्वारीसाठी सज्ज झाले आहेत.

या आधीचा इतिहास पहाता महापौरपदाच्या कर्तृत्त्वावर अनेकांनी खासदार व आमदार होण्याचा पराक्रम गाजवला आहे. तर, काहिनी थेट राज्य मंत्रीपदापर्यंत मजल मारली. उत्तरमराव ढिकले यांची महापौरपदाची कारर्कीद गाजली होती. ढिकले यांचा ‘महापौर तुमच्या भेटी’ला हा उपक्रम लोकप्रिय ठरला होता. या जोरावर नाशिककरांनी ढिकले यांना खासदार केले.

नंतर पुन्हा आमदार केले. त्यांचा कित्ता पुढे शहराच्या पहिल्या महिला महापौर डॉ. शोभा बच्छाव यांनी गिरविला. सन 2004 मध्ये आमदार होत त्यांनी विधानसभेची पायरी चढली. एवढचे नव्हे तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी आरोग्य राज्य मंत्रीपदाची धुराही सांभाळली.

पुढे 2009 विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ नाशकात जोरदार कडाडली. परिणामी माजी महापौर उत्तरराव ढिकले व वसंत गिते यांनी थेट विधानसभा गाठली. विशेष म्हणजे या दोघांनी माजी महापौरांचा पराभव केला. ढिकले ंहे नावाजलेले पैलवान होते.

हे कौशल्य त्यांनी राजकीय आखाड्यात दाखवले. माजी महापौर बाळासाहेब सानप यांना आस्मान दाखवत त्यांनी दुसर्‍यांदा आमदार चषक पटकावला. तर वसंत गिते यांनी राज्यमंत्री डॉ. बच्छाव यांना धोबीपछाड दिला. गत विधानसभा निवडणुकीत माजी महापौर सानप यांनी पुन्हा एकदा आखाड्यात शड्डू ठोकला. नशिबाने म्हणा अथवा मोदी लाटेने सानप यांना कौल दिल्याने त्यांनी विधानसभेची पायरी चढली.

आता निवडणुकीचे पडघम वाजत आहे. आमदार होण्यासाठी पुन्हा एकदा माजी महापौरांनी लवाजमासह मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. माजी महापौर डॉ. बच्छाव, वसंत गिते हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. बाळासाहेब सानप यांनी देखील दुसर्‍या टर्मची तयारी केली आहे. तर शिवसेनेच्या पाठिंब्यांवर अपक्ष महापौर पद भूषिविणारे विनायक पांडे हे देखील आखाड्यात उडी घेतील, असे बोलले जाते. त्यामुळे कोणता माजी महापौर यंदा आमदार चषकावर नाव कोरतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.


आधी आमदारकी नंतर महापौर

काँग्रेसचे शांतारामबापू वावरे शहराचे प्रथम महापौर होते. मात्र ते महापौर होण्याअगोदर काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार झाले होते.


खैरे, पाटील यांचा पराभव

शहराचे दुसरे महापौर पंडितराव खैरे 1990 मध्ये निवडणुकीला उभे होते. भाजपचे गणपतराव काठे यांनी त्यांचा पराभव केला होता. तर दशरथ पाटील यांची महापौरपदाची कारर्कीद प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मात्र, 2004 मध्ये लोकसभेला त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी दोनदा विधानसभेसाठी नशिब आजमावले पण जनतेने त्यांना कौल दिला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!