मुंढेगावची इंग्रजी आश्रमशाळा राज्यासाठी दीपस्तंभ : केंद्रीय आदिवासी मुख्य सचिवांकडून कौतुक

0

इगतपुरी । दि. १६ प्रतिनिधी | मुंढेगाव ता. इगतपुरी येथील आदिवासी विकास विभागाची इंग्रजी माध्यम आश्रमशाळा राज्यासाठी दीपस्तंभ आहे. या शाळेतून आदिवासी विद्यार्थी विद्यार्थीनी समृद्ध शिक्षणासह समृद्ध पोषणाने परिपूर्ण होत आहेत. ही शाळा आमच्या विभागासाठी भूषणावह ठरत आहे. आदिवासींसाठी मॉडेल ठरलेली ही शाळा इतर शाळांसाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गार नवी दिल्लीच्या आदिवासी खात्याचे केंद्रीय मुख्य सचिव डॉ. नवलजीत कपूर यांनी काढले.

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्ताने केंद्रीय मुख्य सचिवांनी मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये होणारे योग्य पोषण हा देशाच्या आरोग्य व कल्याणासाठी मुख्य मुद्दा आहे. मुख्याध्यापक किशोर पगारे यांचे विशेष कौतुक करीत त्यांनी ह्या आश्रमशाळेतील संकल्पना देशाच्या अन्य भागात राबवण्यासाठी सूचना करणार असल्याचे सांगितले.

देशभरात सप्टेंबरपासून राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जात आहे. देशातील स्त्रिया व मुलांमधील कुपोषणाच्या व्यापक समस्या लक्षात घेऊन हे आयोजन केले जाते. मुंढेगावच्या आश्रमशाळेत कुपोषण सोडविण्यासाठी कारणे, परिणाम, उपाययोजनांविषयी जागरुकता आणण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. येथून पुरवण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा आहार योजनेच्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची केंद्रीय मुख्य सचिव डॉ. नवलजीत कपूर यांनी पाहणी करून अधिक माहिती समजून घेतली.

येथील निर्मळ स्वच्छतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी रांगोळी, चित्रकला, पाककृती स्पर्धा, पथनाट्य, प्रश्नोत्तर, चर्चासत्र, परिसंवाद, पोषण पोस्टर स्पर्धा आणि स्लोगन लेखन स्पर्धा यांची समग्र माहिती घेतली. यावेळी नाशिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पाधिकारी अविनाश चव्हाण, उपायुक्त प्रदीप पोळ, मुख्याध्यापक किशोर पगारे, नोडल अधिकारी निलेश अहिरे, प्लांट व्यवस्थापक कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागाच्या मुंढेगाव येथील इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत आदिवासी खात्याचे केंद्रीय मुख्य सचिव डॉ. नवलजीत कपूर यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी अधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित होते.

पोषक महत्त्व समजून घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य पोषण प्रदान करण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. मुंढेगाव आश्रमशाळेच्या माध्यमातून आम्हाला नवे मॉडेल मिळाले आहे. ह्याचा आम्ही देशभरात नक्कीच वापर करणार आहोत.

-डॉ. नवलजीत कपूर, केंद्रीय मुख्य सचिव, आदिवासी विभाग.

सही पोषण मुंढेगाव स्कुल रोषण हे ब्रीदवाक्य घेऊन प्रकल्पाधिकारी अविनाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार काम करीत आहोत. आमची यंत्रणा सक्रीयतेने काम करीत असल्याने आमचा उद्धेश सफल झालेला आहे.
– किशोर पगारे, मुख्याध्यापक मुंढेगाव आश्रमशाळा

LEAVE A REPLY

*