Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक सेल्फी

नाशिककरांच्या पसंतीचे आठ फेमस ‘टी स्टाॅल’

Share

चहा हे पांरपारिक पेय आहे. चहा! एखाद्याच्या तोंडून नावं जरी निघाल तरी मरगळलेला माणूस ताजातवाणा होतो. त्यात चहाप्रेमी असलेल्या नाशिककरांना तरतरी देणाऱ्या काही खास ‘टी’पॉइण्ट्स आणि तेथील चहा विषयी थोडंस.

– गणेश सोनवणे, केटीएचएम महाविद्यालय (प्रशिक्षणार्थी पत्रकार)

तंदुरी चहा (राजदूत हॉटेल)

त्र्यंबक नाका परिसरातील ठक्कर बाजार येथील राजदूत हॉटेल तंदूरी चहासाठी खास आहे. एका मोठ्या तंदूरमध्ये मातीची मटकी गरम करून त्यात चहा ओतला जातो. त्यामुळे त्याला एक मातीचा सुंगध आणि स्मोकी फ्लेवर येतो. हा चहा तयार करण्याची पद्धती अनोखी असल्याने ग्राहक चहा पिण्याबरोबरच चहा तयार करण्याची पद्धती आवर्जून पाहतात. या चहाची किंमत अंदाजे 35 रु. इतकी आहे.

सलीमचा चहा

कॉलेजरोडवरील सलीम मामूचा चहा प्रसिद्ध आहे. वेलदोड्यांचा मारा करून व घरगुती मसाला टाकून बनविलेला हा चहा चवीला अनोखा आहे. त्यामुळे अनेकजण येथील चहाचे शौकीन आहेत. या चहाची किंमत अंदाजे 10 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत इतकी आहे. दिवसभरात केव्हाही याठिकाणी गेलं तरी चहाच्या शौकिनांची मोठी गर्दी याठिकाणी दिसून येते.

विश्रांतीगृह

सराफ बारातील हॉटेल विश्रांतीगृह येथील ‘टक्कर’चहासाठी प्रसिद्ध आहे. घरगुती मसाला वापरून बनवलेल्या या चहाची चव युनिक आहे. सराफ बाजार परिसरातील लोकांचा हा आवडीचा चहा आहे. या चहाची किंमत अंदाजे कट रपये 7 आणि स्पेशल रू 20 अशी आहे. विशेष म्हणजे विश्रांतीगृहाची तिसरी पिढी चहाच्या व्यवसायात आहे.

चायटपरी

नाशकात कॉलेजरोड, पंडीत कॉलनी, नाशिकरोड, इंदिरानगर, दिंडोरी रोड तसेच महाविद्यालये असलेल्या परिसरात या चहाच्या शाखा आहेत.’चाय टपरीचा चहा ‘प्रसिद्ध असून एक-एक करत अनेक शाखा सध्या शहरात सुरु आहेत. हा चहा विशिष्ट मसाला व इलायची वापरून केला जातो. ग्राहकाला त्याच्या आवडीनुसार आलं, गवती चहा, इलायची, मसाला वापरून विविध प्रकारचा व हवा तो चहा बनवून दिला जातो. त्याला ‘मेक माय टी ‘म्हणतात. या चहाची किंमत अंदाजे १८ रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत आहे. महाविद्यालयीन तरुणाई या चहाच्या फॅन आहेत.

जय बाबाजी टी स्टॉल

अशोक स्तभं परिसरातील जय बाबाजी टी स्टॉल गवतीचहासाठी फेमस आहे. आलं आणि गवती चहा घालून केलेल्या चहाला विशिष्ट सुंगध असतो. आरोग्यासाठी देखील हा चहा गुणकारी समजला जातो. या चहाची किंमत अंदाजे रू 5 ते रू 8 इतकी आहे. येथील गवती चहाची परंपरा ४७ वर्षे जुनी आहे. परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पाच रुपयांत हा चहा मिळतो, त्यामुळे सकाळपासून याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.

हाजी टी

दादासाहेब फाळके रोडवरील हॉटेल हाजी दरबार शेजारी असलेला हाजी टी इराणी चहासाठी प्रसिद्ध आहे. इराणी पद्धतीने चहा पावडर व साखर आणि दूध स्वतंत्रपणे उकळवून बनवला जाणारा इथला चहा चवीला अस्सल आहे. शहरातील कानाकोपऱ्यातून अनेकजण याठिकाणी चहा घेण्यासाठी गर्दी करत असतात. दुबईच्या धर्तीवर हे दुकान सजविले आहे. तसेच येथील बैठकव्यवस्थाही अनोख्या प्रकारची आहे. याठिकाणी पर्यावरणपूरक साध्या कागदी ग्लासात चहा मिळतो. चहाची किंमत अंदाजे रूपये 10 ते 20 इतकी आहे.

रामभरोसे टी स्टॉल

शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन जवळ रामभरोसे टी स्टॉल आहे. येथील चहाला वेलदोडे आणि जायफळाचा सुंगध आहे. चहाचा घट्टपणा हे देखील इथले वेगळेपण आहे. या चहाची किंमत अंदाजे रु 10 ते 20 इतकी आहे.

हरिओम टी स्टॉल

मेहर सिग्नल येथील हरिओम स्पेशल चहा हा खास इलायची व घरगुती मसाला वापरुन बनवला जातो. या चहाची चव निराळी असल्याने लोक लांबून हा चहा पिण्यासाठी येतात . या चहाची किंमत अंदाजे रु 10 इतकी आहे. येथील चहा १०० टक्के दुधाचा बनवला जातो. याठिकाणी स्पेशल चहा मिळत नाही, एकाच प्रकारचा चहा बनविला जातो. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास येथे मोठी गर्दी होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!