Type to search

देशदूत संवाद कट्टा नाशिक

दुर्ग भ्रमंतीतून जगण्याची नवी वाट; दुर्ग-दुर्गा ग्रुपने दिला महिलांना निसर्ग सानिध्याचा आनंद

Share

नाशिक । प्रतिनिधी

घरातील जबाबदारीचे ओझे वागवताना, ताणतणावातून काहीशी सुटका मिळावी, यासाठी एक दिवस स्वतःसाठी देखील दिला पाहिजे. या एका दिवसाचा मिळणारा आनंद वाटून घेणारे कोणी सोबत असेल तर जगण्याची गंमत काही औरच असते. आय एम नाशिक या कन्सेप्टच्या माध्यमातून हाच आनंद मिळवून देण्यासाठी महिलांसाठीच्या दुर्गर्-दुर्गा ग्रुपने पुढाकार घेतला आहे. गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीच्या माध्यमातून या ग्रुपशी जोडल्या गेलेल्या महिला निसर्गाच्या सानिध्यात महिन्यातला एक दिवस घालवतात आणि धकाधकीच्या जीवनशैलीत जगत असताना जगण्यातला आनंददेखील मिळवत असतात. ‘देशदूतच्या नवदुर्गा’ उपक्रमातून देवीचे सिद्धिदात्री हे रूप प्रतिबिंबित करण्यात आले की, जे या दुर्ग- दुर्गांशी साम्य दाखवणारे होते.

आय. एम. नाशिक ही डॉ. भरत केळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली कन्सेप्ट आवडीचे छंद जोपासण्यासाठी नाशिककरांना प्रोत्साहन देत आहे. सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यस्त जीवनशैली असणार्‍यांना ताणतणावातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

#DeshdootFBLive आजच्या नवदुर्गा : दुर्ग दुर्गा गृप

Posted by Deshdoot on Sunday, 6 October 2019

शहरातील महिलांसाठी असणार्‍या दुर्ग- दुर्गा या ग्रुपच्या माध्यमातून पुरुषी मक्तेदारी असणार्‍या ट्रेकिंग या प्रकारातील खडतर अनुभव दिले जातात. निसर्गाच्या थेट सानिध्यात जगण्यातला आनंद शोधण्यासाठी ही दुर्ग भ्रमंती फायदेशीर ठरत असल्याने या ग्रुपकडे महिलांचा ओढा चांगलाच वाढला आहे. ट्रेकिंगने केवळ शरीर तंदुरुस्त होत नाही तर मानसिकदृष्ट्या मिळणारे समाधानदेखील मोठे आहे. नाशिकमध्ये हा ग्रुप सुरू झाल्यावर अल्पावधीत व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रुप बनवावे लागले होते.

म्हणजेच सुमारे 700 महिला या ग्रुपसोबत एकावेळी जोडल्या गेल्या होत्या. नाशिकजवळच्या रामशेज किल्यावर या ग्रुपचा पहिला ट्रेक पार पडला. आतापर्यंत जवळपास 14 ट्रेक या ग्रुपने पूर्ण केले असून वर्षातून एकदा आयोजित केला जाणारा मनाली ट्रेकदेखील हाऊसफूल असतो, हे विशेष. प्रत्येक महिन्यातल्या पहिल्या रविवारी दुर्ग-दुर्गांचा ट्रेक जवळपासच्या गडकिल्यावर आयोजित केला जातो. विविध क्षेत्रात जबाबदार्‍या सांभाळणार्‍या महिला या ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत.

प्रापंचिक जबाबदारीला प्राधान्य देत महिलांनी ट्रेकिंगची आवड जोपासली आहे. या ग्रुपमध्ये केवळ महिला असल्याने त्यांना सहजपणे घराबाहेर पडण्याची मोकळीक असते. आवड असेल तर सवड मिळते, हे वाक्य या महिलांच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. ग्रुपमध्ये सोबत जाताना बाहेरचे जेवण, खाणे-पिणे जाणीवपूर्वक टाळले जाते. स्वतःच्या घरूनच जेवणाचे डबे बनवून आणले जातात. ग्रुपमध्ये असणार्‍या महिला एकमेकींची काळजी घेतात.

म्हणूनच वयाची 75 वर्षे पार केलेल्या आजीबाईदेखील ट्रेकमध्ये सहभागी होत असतात. एकमेकींची सोबत करताना अवखळ मैत्री अनुभवायला मिळते. शालेय वयात असतो तो उत्साह पन्नाशीच्या टप्प्यावर असणार्‍या महिलांमध्ये बघायला मिळतो. बरोबर जायचे आणि बरोबर परत यायचे हे सूत्र पाळले जात असल्याने कुणी मागेपुढे राहत नाही. यामुळेच प्रत्येक ट्रेकमध्ये नवनवीन सभासद जोडले जात असतात.

मानसिक ताणतणाव घालवण्यासोबतच शारीरिक दृष्ट्यादेखील सक्षम करणारा हा जगावेगळा छंद या महिला जोपासत असून आपल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार्‍या या महिलांनी शक्तीचे सिद्धिदात्री हे रूप खर्‍या अर्थाने सार्थ ठरवले आहे, अशा शब्दांत देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी दुर्ग-दुर्गा ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक केले.

शुभदा देसाई, रोहिणी पाटील, संगीता सोनवणे, अश्विनी बेलगावकर, शीतल कानडे, दीपाली गडाख, आरती भोज, स्मिता वाळुंज, उर्मिला आडके या दुर्ग- दुर्गा ग्रुपच्या सदस्यांनी देशदूतच्या व्यासपीठावर हजेरी लावत ग्रुपच्या माध्यमातून राबवल्या जाणार्‍या उपक्रमांबद्दल माहिती सांगितली. फिटनेसतज्ञ पूनम आचार्य यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी शारीरिक ताणतणाव घालवण्यासाठी व्यायामाच्या सोप्या पद्धती समजावून सांगितल्या. सहभागी महिलांकडून त्यांनी प्रात्यक्षिके देखील करवून घेतली.


नवदुर्गांनी उलगडली शक्तीची रुपे

‘देशदूत’ने नवरात्रीनिमित्त शक्तीच्या अर्थात देवीच्या नऊ रुपांचे सादरीकरण नवदुर्गाच्या माध्यमातून केले. या उपक्रमात शहरातील कचरा वेचणार्‍या महिलांपासून ते बांधकाम, वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील जबाबदारी वाहणार्‍या महिलांनी सहभाग नोंदवला. नऊ दिवसांत शक्तीच्या विविध रुपांचे त्यांच्या वैशिष्ट्यांसह दर्शन घडवले.

– डॉ. वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक, देशदूत

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!