Type to search

Exclusive : इतना ‘सन्नाटा’ क्यों है नांदगाव में…?

Special दिवाळी विशेष - रिपोर्ताज

Exclusive : इतना ‘सन्नाटा’ क्यों है नांदगाव में…?

Share

पंकज जोशी | देशदूत डिजिटल विशेष

नाशिक ता, १८ : ‘आज जर पालकमंत्री नांदगावमध्ये आले नसते, तर सरकारविरोधातल्या संतापाचा आगडोंब उसळला असता ’… नांदगाव तहसिल कार्यालयातील दुष्काळ आढावा बैठकीला आलेले काही सरपंच आणि संघटनांचे नेते आपली भावना बोलून दाखवित होते.

नांदगाव शहराबाहेर येथील तहसिल कार्यालय आहे. सोमवारी (१५ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास येथे पालकमंत्र्यांची दुष्काळ आढावा बैठक होणार होती. पण पालकमंत्री गिरीष महाजन यांना देवळा आणि बागलाण तालुक्यातील दुष्काळी भागांत पाहणी करतानाच उशीर झाला.

दुपारनंतर ही बैठक रद्द होणार असेच सूत्रांकडून समजत होते. पण अखेर सायंकाळी सहाला बैठक होणार असे समजले. त्यामुळे तहसिल कार्यालयाने पुन्हा तयारी केली. बैठकीची मांडामांड झाली. ज्या गावांना दुष्काळाच्या झळा बसल्या तेथील ग्रामस्थ, सरपंच, पंचायत समिती सदस्य यांच्यासह तालुक्याचे आमदार, विविध पक्षांचे प्रमुख, पत्रकार असे सर्वच साडेसहापासूनच येथे उपस्थित होते.

आता मंत्री महोदय येणार आणि बैठक सुरू होणार अशी घोषणा झाली असतानाच, सव्वासातला अचानक बातमी आली की गिरीष महाजन चौफुलीवरूनच परत फिरले आणि क्षणात बैठकीतला माहौल बदलला. उपस्थित पत्रकारांसह काही प्रतिनिधींनी धडाधड रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढायला सुरूवात झाली. उपस्थितांमध्ये संतापाची भावना पसरली. पण त्यानंतर अचानक पुन्हा फोन आला आणि मंत्री महाजन हे बैठकस्थळी येणार असल्याची बातमी आली आणि सर्वजण पुन्हा जागेवर बसले.

साधारणत: साडेसातच्या सुमारास पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आगमन झाले. उशिर झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आणि बैठकीला सुरूवात झाली. नांदगाव येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी नांदगाव आणि येवला तालुक्याच्या दुष्काळी स्थितीचा आढावा मांडला. त्यानंतर उपस्थित संघटनांचे प्रमुख आणि प्रतिनिधींनी दुष्काळ आणि पाणीटंचाईचे प्रश्न मांडले.

नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांनी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून समस्या मांडली. दोन वर्षांपासून नांदगाव परिसरात पाऊस कमीच पडला आहे. यंदा तर बिकट स्थिती आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गिरणा धरणातून नांदगाव शहरासह ५६ खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरूस्तीची गरज असल्याची गरजही आ. भुजबळ यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे भुजबळ बोलायला उभे राहिले तेव्हा बैठकीच्या ठिकाणी अचानक शांतता पसरली. ते काय बोलतात याकडे सर्वच लक्ष देऊन ऐकत होते.

असा दुष्काळ आपण पाहिलाच नाही, अशी कबुली खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चारा छावण्यांपासून ते मागेल त्याला तातडीने पाण्याचा टँकर देण्यापर्यंत तातडीने उपाय योजना करण्याबद्दलचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. भविष्यात पाणी टंचाईची स्थिती येऊच नये यासाठी महत्त्वाकांक्षी असलेली नार-पार ही नदीजोड योजना लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.

बैठक संपताच आपल्या मागण्यांच्या निवेदनासाठी पालकमंत्र्यांना अनेकांनी गराडा घातला. साधारणत: साडेनऊच्या सुमारास आधी मंत्र्यांचा ताफा निघून गेला आणि टेकडीवर असलेल्या तहसिल कार्यालयाबाहेर पुन्हा नेहमीचा अंधार पसरला.

निवेदन देण्यासाठी पालकमंत्र्यांभोवती झालेली गर्दी

बाजारपेठ आहे थंड थंड

ऐन दसऱ्याच्या तोंडावर नांदगावच्या बाजारपेठांमध्येही असाच अंधार पसरलेला आहे. बाजारातील उलाढाल ही मुख्यत: शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीवरच अवलंबून असल्याने ही स्थिती उद्भवली. दरवर्षी या ठिकाणी दसऱ्यानिमित्ताने सोने आणि विविध वस्तू घेण्यासाठी गर्दी होते आणि त्यानंतर बाजारपेठेतील उलाढाल वाढते ती दिवाळीपर्यंत. पण यंदा अगदी उलट स्थिती आहे.

येथील प्रसिद्ध गांधी चौकाला लागूनच असलेल्या सराफ बाजारात दसऱ्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच मंगळवारी शांतता होती. खरे तर संध्याकाळनंतर खरेदीचा वेग वाढतो. तिन्हीसांजा म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ, पण येथील अनेक दुकानदार ग्राहकांची वाट पाहताना दिसून आले.

नांदगाव शहरातील सर्वात मोठी पेढी असलेल्या खरोटे ज्वेलर्समध्ये एखाददुसरे ग्राहक वगळता शांतता होती. भव्य शोरूम, गणवेश असलेला मोठा कर्मचारी वर्ग आणि १०० वर्षांपासूनची परंपरा असलेली ही सुवर्णपेढी आहे.

दसऱ्याच्या तोंडावर सुना सुना सराफ बाजार

‘आता आपण समोरासमोर बसून निवांत बोलतोय. पण मागच्या वर्षी याच काळात तुम्ही आमच्याकडे आलला असता, तर तुम्हाला दुकानात पाय ठेवायलाही जागा मिळाली नसती, इतकी गर्दी आमच्याकडे असते.’ या पेढीचे संचालक कुणाल खरोटे सांगत होते. ‘यंदा आमच्या व्यवसायात ८० टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. जे कोणी खरेदी करत आहेत, ते व्यापारी किंवा नोकरदार आहेत. पण आमचे ८० टक्के ग्राहक शेतकरी आहेत. यंदा पावसाने दगा दिला आणि शेतकऱ्यांनीही सोने खरेदीकडे पाठ फिरविली’, हे सांगताना श्री. खरोटे यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

सराफ बाजाराप्रमाणेच नांदगावमधील कपडे आणि इतर दुकानांमध्येही शांतताच दिसून आली. दसऱ्यासारखा सण दोन दिवसांवर आलाय हे बाजारपेठेत फिरल्यावर जाणवतच नव्हते. येथील काही व्यापाऱ्यांनी माल खपविण्यासाठी अनेक शक्कल लढविल्या आहेत. काही कपड्यांच्या ‘दुकानात एकावर एक मोफत’  या सारखे जाहिरात फलक झळकले आहेत, तर कुठे शून्य टक्के व्याजदराने वस्तू घ्या- यासारख्या योजना सुरू आहेत. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कपड्यांचे एक मोठे शोरूम शहरात अलिकडेच सुरू झाले. पण तिथेही ग्राहकांचा दुष्काळच जाणवला.

कुणाल खरोटे, सराफ, नांदगाव

सराफ बाजारापासून पुढच्याच गल्लीत सोन्या मारूतीचे छोटे मंदिर आहे. या परिसरात भांड्यांची दुकाने आहेत. देवेंद्र मेटल्स हे त्यापैकीच एक मोठे दुकान. मागील ४० वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. या दुकानाचे संचालक देवेंद्र पोपटराव शेटे म्हणाले, ‘यंदाची परिस्थिती खूपच बिकट आहे. आम्ही ग्राहकांची वाट पाहतो, पण ते घटलेय. दसरा-दिवाळीनिमित्त आम्ही मालाचे दर २५ टक्क्यांनी कमी केलेय,  तर काही वस्तूंवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे. पण जसे तुम्ही पाहताय, त्याप्रमाणे भांड्यांसाठी दुकानात ग्राहकच नाहीत. पाणी टंचाईमुळे ही स्थिती आली आहे. यापुढे तर आणखी बिकट परिस्थिती येऊ शकते.’

मागच्या वर्षी याच काळात खरेदीसाठी गर्दी होत होती. पण यंदा कंपनी भावात माल देण्याची तयारी दाखवूनही बाजारपेठेत ग्राहक तुरळक होत असल्याचे वास्तव शेटे यांनी मांडले. त्यांचे मुख्य ग्राहक तालुक्यातील शेतकरी हेच आहेत. यंदा शेतकरी अडचणीत आला म्हणून व्यवसायही अडचणीत आल्याचे ते सांगतात.

नांदगावला एमआयडीसी नाही. किंवा उत्पन्नाचे अन्य् स्त्रोतही नाही. येथील अर्थकारण मुख्यत: परिसरातील शेतीवरच अवलंबून आहे. नोकरदारांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. पूर्वी येथे रेल्वेचे लोकोशेड होते, त्यामुळे केंद्र सरकारचे रेल्वे कर्मचारही बरेच होते. पण हे शेडही दुसरीकडे हलविल्याने हे कर्मचारीही कमी झाले.

देवेंद्र शेटे, भांडी व्यावसायिक, नांदगाव

सुमारे ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या नांदगाव शहरातला जसे स्वत:चे अर्थकारणाचे साधन नाही, तसेच पाण्याचेही साधन नाही. मुळात तालुक्यात सरासरी साडेचारशे मिमी इतकाच पाऊस पडतो. जवळ असलेल्या माणिकपुंज, गिरणा यांच्या पाण्यावरच या शहराला अवलंबून राहावे लागते. तालुक्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांची एकत्रित साठवण क्षमता जेमतेम दीड टीएमसी इतकी आहे. त्यामुळे तालुक्यातील सिंचनाखालील शेतीचे क्षेत्र केवळ ५ टक्के इतकेच आहे.

शहराला लागूनच नदी वाहते, पण तिचा नाला झाला आहे. २०११मध्ये एकदा चांगला पाऊस झाला तेव्हा या नदीला पूर आला होता. तोही काही नाल्याचे पाणी नदीत आल्याने. एरवी ती गटारगंगा म्हणूनच ओळखली जाते. सध्या नांदगाव शहरात आठ ते दहा दिवसांनी एकदा नळाचे पाणी येते. नळाला दीड ते दोन तास येणारे हे पाणी साठविण्यासाठी रहिवाशांना मोठीच कसरत करावी लागते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या, मोटारी पाईप यांचा खप या गावात बऱ्यापैकी दिसून येतो.

माणिकपुंज आणि गिरणा धरणातून नांदगाव शहराला पाणी पुरवठा होतो. शहर आणि परिसरात अनेकांकडे जुने आड किंवा बोअरवेल आहे. त्यांची पातळी आता ४०० मीटरपेक्षाही खोल गेलेली आहे. संक्रांतीनंतर तर आमच्या गावात पाण्याचे टँकरही सुरू होतील असे रहिवासी सांगतात.

सर्व काही पाण्यासाठी

गमतीचा भाग म्हणजे नांदगाव शहर आणि तालुक्याचे राजकारणही पाणी या एकाच गोष्टीभोवती फिरताना दिसते. नांदगाव शहरात अलिकडेच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाणी हाच मुख्य मुद्दा होता. सद्याचे नगराध्यक्ष त्यामुळेच निवडून आल्याचे सांगितले जाते.

‘पूर्वी २० ते २२ दिवसांनी पाणी यायचे पण मध्यंतरी झालेल्या निवडणुकांदरम्यान कवडे यांनी आपण आठ दिवसांनी पाणी आणू असे आश्वासन दिले. त्यामुळे नांदगाव करांनी त्यांना निवडून दिले,’ शहरातील एक ज्येष्ठ व्यापारी सांगत होते. मग झाल का अपेक्षित परिणाम? असे विचारल्यावर ते म्हणाले की हो आता सात ते दहा दिवसांनी एकदा पाणी येते.

नाशिक जिल्ह्यासह खान्देश आणि मराठवाड्याच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने मह्त्वाचा समजल्या जाणाऱ्या नार-पार अर्थातच नार-पार आणि दमणगंगा नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआर अर्थातच विकास आराखड्यात अलिकडेच नांदगावचा समावेश करण्यात येथील काही कार्यकर्त्यांना यश आले आहे. येत्या दोन महिन्यांतच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकते. हा प्रकल्प झाला, तर नांदगाव शहरासह तालुक्यातील सुमारे ८० गावातील शेती सिंचनाखाली येणार आहे.

नांदगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील, डॉ. प्रभाकर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नार-पार योजनेत नांदगावचा समावेश व्हावा यासाठी मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यात त्यांना यशही आले आहे. आता प्रतिक्षा आहे ती हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्याची.

समाधान पाटील म्हणाले की पाणी टंचाई निर्माण झाली की धरणातून पाईपलाईनसारख्या लोकप्रिय योजनांची घोषणा होते. पण मुळात त्या धरणात किती पाणी आहे? याचा विचारच कुणी करत नाही. आमचा तालुका भौगोलिकदृष्ट्या एका बाजूला असलेला ‘आयसोलेटेड’ तालुका आहे. त्यामुळे सध्या तरी आम्हाला पाण्यासाठी  माणिकपुंज किंवा गिरणावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच आम्ही स्वखर्चाने नार-पारच्या प्रकल्प अहवालात नांदगावचा समावेश व्हावा यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत राहिलो.

श्री. पाटील यांचे सहकारी असलेले डॉ. प्रभाकर पवार सांगतात की नार-पारचे पाणी नांदगावमधून गेल्यास शहराचा पाणीप्रश्न शाश्वत स्वरूपात सुटेल. आम्ही नितीन गडकरींपर्यंत याचा पाठपुरावा केला आणि नांदगावाचे नेतेही राजकारण विसरून या प्रकल्पासाठी एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

राष्ट्रीय जल प्राधिकरण आणि इंटरनॅशनल कन्सलटंट इन वॉटर रिसॉर्स पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यांनी नारपारच्या डीपीआर वर काम केले. समाधान पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभियांत्रिकी पद्धतीने आराखडा तयार करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला.

उदय पाटील (डावीकडे), समाधान पाटील (मध्यभागी), डॉ. प्रभाकर पवार (उजवीकडे)

‘एव्हाना या प्रकल्पाला सुरूवात व्हायला हवी होती. पण राज्य सरकारने फारशी अनुकुलता दर्शविली नाही आणि प्रकल्प लांबत गेला. अन्यथा यंदाची टंचाईसारखी स्थिती तुम्हाला या शहरात दिसली नसती.’ समाधान पाटील सांगतात.

नार पार योजनेप्रमाणेच या तालुक्यात जलयुक्त शिवार- मुलस्थान जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर यासारख्या गोष्टी एकात्मिक पद्धतीने शास्ञोक्त रितीने राबविण्याची गरज पाणी क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ बोलून दाखवितात.

निसर्ग हा आपल्याला पुरेसा देत असतो, पण ते आपल्याला घेता न आल्याने अनेकदा दुष्काळ हा मानवनिर्मितच ठरतो.  त्यासाठी जलसंधारणाच्या दीर्घकालिन आणि शाश्वत उपाययोजना हव्यात आणि त्या राबविण्याची दूरदृष्टी असणारे नेते आणि प्रशासनही हवे. तसे झाले तर नांदगावला यंदा जी अभूतपूर्व टंचाई झालीय तशी भविष्यात कुठल्याच गावाला येणार नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Next Up

error: Content is protected !!