Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

समृध्दी बाधीत विहिरीने दिला दुष्काळात दिलासा; तहान भागविणारी विहिर पावसाळ्यापर्यंत न बुजविण्याची मागणी

Share

डुबेरे | वार्ताहर

दुष्काळात रहिवाशांची तहान भागविणारी विहिर समृध्दी महामार्गात सापडल्याने रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले असून किमान पावसाळा सुरु होईपर्यंत तरी ही विहिर समृध्दी महामार्गाच्या यंत्रणेने बुजवू नये अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

शासनस्तरावरुन तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी युध्दपातळीवर उपाय योजना राबविल्या जात असून नागरीक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शासन, सामाजिक संस्थांसह उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. गावागावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन नागरीकांची तहान भागविली जात आहे.

डुबेरे परिसरातील २५० हून अधिक लोकसंख्येची वस्ती समृध्दी महामार्गात विस्तापित झाली आहे. महामार्गाच्या कामासाठी येथील घरे पाडण्यात आली आहे. अनेकांनी आजूबाजूला उर्वरित क्षेत्रामध्ये निवार्‍याची व्यवस्था करुन घेतली आहे.

शंकर ढोली यांनी गट क्रमांक ४६७ मध्ये ८४ फूट विहिर खोदलेली आहे. ऐन दुष्काळातही तासभर विद्युतपंप सुरु राहिल एवढे पाणी दररोज या विहिरीत जमा होते. त्यामुळे अनियमित टँकरच्या फेर्‍यांमधून येथील रहिवाशांची सुटका झाली आहे. या विहिरीवरच संपूर्ण परिवाराची तहान भागविली जाते.

दररोज विहिरीतून पाणी पुरवठा केला जात असल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. परिसरात समृध्दी महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. ही विहिर महामार्गात येत असल्याने महामार्गाच्या कामासाठी बुजवली जाणार आहे.

त्यामुळे दुष्काळात पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याने महिलांच्या तोंडचे पाणी पळाले असून किमान पावसाळा सुरु होईपर्यंत तरी समृध्दी महामार्गाच्या अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेतून ही बुजू नये अशी मागणी सुनिल ढोली, नवनाथ ढोली, दशरथ ढोली, आशा ढोली, रोहिणी जाधव, बाळासाहेब बर्वे, संदिप निमसे, संजय वाजे, स्वाती जाधव, शोभा बर्वे, अरुण बर्वे यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.

रहिवाशांना दिलासा द्यावा

परिसरात भिषण पाणीटंचाई असून टँकरवरच गाव परिसराला अवलंबून रहावे लागते. ढोली मळ्यासह आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांसाठी या विहिरीतून सध्या दररोज मुबलक पाणीपुरवठा होतो आहे. रहिवाशांना या विहिरीने मोठा दिलासा मिळाला आहे. विहिर बुजली तर पाण्यासाठी रहिवाशांना भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गाच्या अधिकार्‍यांनी पावसाळा सुरु होईपर्यंत ही विहिर बुजवू नये एवढीच अपेक्षा. सुनिल ढोली, शेतकरी

तहसिलदारांना निवेदन देणार

शासनाकडून उपलब्ध झालेल्या टँकरच्या फेर्‍यांवरच गावाची तहान भागविली जात असून सामाजिक संस्थांकडून मिळणार्‍या टँकरने दिलासा दिला आहे. वाड्या-वस्त्यांना पाणी पुरविण्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागते. दुष्काळी परिस्थितीत सदर विहिरीतून परिसरातील २००-२५० कुटूंबांना मुबलक पाणी मिळते आहे. दुष्काळात विहिरी अधिग्रहीत करुन रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. पावसाळा सुरु होईपर्यंत ही विहिर बुजवू नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावरुन तहसिलदारांना निवेदन दिले जाणार आहे.

सविता वारुंगसे, सरपंच

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!