दुष्काळग्रस्त येवल्यातील ५ हजार विद्यार्थी मोफत पासपासून वंचित

0

विखरणी (राजेंद्र शेलार) | महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत उशिरा का होईना येवला तालुक्याचा समावेश झाला. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या यादीत येवला तालुक्याचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांना मोफत पास पासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले आहे.

शासनाने दोन टप्प्यात दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले होते. त्यातील पहिल्या टप्प्यातील तालुक्यांना एस टी महामंडळाने विद्यार्थ्यांना सवलत जाहीर केली. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील तालुक्यांना वगळले गेल्याने एकट्या येवला तालुक्यातील ५ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाच्या ०५ नोव्हेंबर २०१८च्या परिपत्रकाअन्वये तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उर्वरित सत्राकरीता मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जिल्ह्यातील आठ तालुके पहिल्या यादीत जाहीर झाले. दुसऱ्या यादीत येवला व निफाड तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले. मात्र, राज्य परिवहनकडे निफाड आणि येवला तालुक्याची दुष्काळग्रस्तम्हणून नोंद झालेली नाही. त्यामुळे मोफत पास देणे शक्य नसल्याचे येवला बसस्थानकाकडून विद्यार्थ्यांना सांगितले.

वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना पास देण्याचे कामकाज सुरू असून परिपत्रकात येवला तालुक्याचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांना मोफत पास देणे शक्य नाही. यासंदर्भात वरीष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. वरीष्ठ कार्यालयाने आदेश दिल्यास विद्यार्थ्यांना तात्काळ मोफत पास पुरवले जातील.

समर्थ शेळके, आगारप्रमुख येवला.

LEAVE A REPLY

*