Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसमृद्धी हायवेवर चाललेय तरी काय? चालकाचा वरिष्ठावर हल्ला; गुन्हा दाखल

समृद्धी हायवेवर चाललेय तरी काय? चालकाचा वरिष्ठावर हल्ला; गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या सोनारी (सिन्नर) ते तारांगणपाडा (इगतपुरी) टप्पा क्र.13 च्या सुरु असलेल्या कामावरील चालकाने आपल्या वरिष्ठाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (दि.12) घडली. याप्रकरणी बीएससीपीएल इन्फ्रास्टक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीच्या वतीने संबंधित चालकासह त्याच्या शिवडे (सिन्नर) येथील एका स्थानिक सहकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

- Advertisement -

बीएससीपीएल या कंपनीला समृद्धीच्या टप्पा क्र.13 साठी नियुक्त करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे या कंपनीचे कार्यालय स्थापण्यात आले असून तेथूनच कामाचे नियंत्रण करण्यात येते. शिवडे येथील दत्तात्रय रुंजा सोनवणे या व्यक्तीला कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून कंत्राटी तत्वावर काम देण्यात आले असून त्याने आपल्या एका साथीदारासोबत येउन कंपनीच्या कार्यस्थळावर वाहन विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण करून जखमी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सोनवणे यांचेकडून गेल्या महिन्यात वाहनाचा अपघात झाला होता. त्यात तो देखील जखमी झाला असल्याने उपचारास मदत करून विश्रांतीसाठी सुटी देण्यात आली होती. दोन आठवड्यांच्या सुट्टीनंतर तो पुन्हा कामावर हजर होण्यासाठी आला असता वाहन विभागाचे प्रमुख टी रमेश यांनी वरिष्ठाना विचारून तुला हजर करून घेण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले.

मात्र, त्याचा राग आल्याने सोनवणे याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी स्थानिक आहे, कामावर घेतले नाही तर पाहून घेईन अशी धमकी देऊन तो निघून गेला. परत काही वेळाने तो वाल्मिकी हारक या साथीदारास घेऊन टी रमेश यांचेकडे आला.

यावेळी रमेश यांनी तुझ्याकडून दोन वेळा अपघात होऊन कंपनीच्या वाहनांचे नुकसान झाले असल्याने परत कामावर घेता येणार नाही असे सांगितले. याचा राग अनावर झाल्याने त्या दोघांनीही रमेश यांना मारहाण करायला सुरुवात केली. तेथे जवळ पडलेला लोखंडी रॉड सोनवणे याने उचलून रमेश यांच्या डोक्यात मारला.

यात त्यांच्या डोक्याला व हातांना गंभीर दुखापत झाली. मारहाणीचा हा प्रकार सुरु असताना कंपनीतील कामगार धावून आल्याने सोनवणे व हारक यांनी तेथून पळ काढला.

जखमी अवस्थेतील प्रकाश यांना प्रथमोपचार करून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

समृद्धी महामार्ग हा राष्ट्रीय प्रकल्प असल्याने या कामावरील कामगार व अधिकाऱ्यांना शासनाकडून संरक्षण मिळावे व संबंधित हल्लेखोरांविरोधात कारवाई करावी अशी मागणी कंपनी प्रशासनाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या