Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव

Share

राजेंद्र शेलार | विखरणी

अतिविषारी जातीचा कोब्रा साप चावल्याने मृत्युच्या दाढेत अडकलेल्या १४ वर्षीय बालिकेला वाचविण्यात येवल्यातील डॉक्टरांना यश आले आहे. डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारानेच मुलीने नवे जग बघितले अशी प्रतिक्रिये मुलीच्या नातेवाईकांनी देत संबंधित डॉक्टरांचे आभार मानले. दवाखान्यात मुलगी बरी झाल्यानंतर तिला केक भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

येवल्याच्या साई सिद्धी रुग्णालयातील दोघा डॉक्टर बंधूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत योग्य उपचार केले. मृत्युच्या दाढेतून मुलीला परत आणण्यात यश मिळवले. याबद्दल सर्वत्र डॉक्टर बंधूंचे पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.

तालुक्यातील साबरवाडी येथील जयश्री लोखंडे या १४ वर्षाच्या मुलीला काही दिवसांपूर्वी घरात असतांना कोब्रा जातीच्या सापाने दंश केला होता.  संध्याकाळी चार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णाच्या आई-वडिलांनी रुग्णावर उपचार करावेत यासाठी येवल्यातील सर्व रुग्णालये पालथी घातली.

मात्र, रुग्णाची अवस्था अतिशय गंभीर असल्याने कोणत्याही रुग्णालयाने रुग्णाला दाखल करून घेतले नाही. दरम्यान, रात्री दहा वाजेच्या सुमारास नातेवाईक रुग्णाला घेऊन श्रीकांत काकड व राहुल काकड यांच्या साई सिद्धी हॉस्पिटलमध्ये आले डॉक्टरांनी तपासले असता रुग्णाची कुठलीही हालचाल होत नव्हती. श्वास पूर्णपणे थाबून रुग्ण कोमात गेला होता. रुग्णाचे हृदय मात्र सुरळीत चालू होते, दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्याचा विचार डॉक्टरांच्या मनात आला पण असे केले तर रुग्णाचा मृत्यू अटळ होता याची जाणीव होताच हाडाच्या डॉक्टर असलेल्या काकड बंधूंनी प्रयत्न करून पाहण्याचे ठरवून रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले.

श्वास बंद झाला असल्याने रुग्णाला कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात येऊन सर्पदंशावर उपचाराची सुरवात करण्यात आली दोन दिवस उपचार करूनही रुग्णाची कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती रुग्णाच्या नातेवाईकांच्या जिवालाही घोर लागला होता.

तिसऱ्या दिवशी उपचारांना प्रतिसाद देत रुग्णांने डोळे उघडले अन नातेवाईकासह डॉक्टरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सातव्या दिवशी जयश्री नामक रुग्ण ३० पायऱ्या उतरून दोघा डॉक्टर बंधूंचे आभार मानण्यासाठी तेव्हा डॉक्टरांच्या डोळ्यातही पाणी आले.

उपचाराच्या या सर्व काळात शिवसेना नेते संभाजी पवार यांनी विषप्रतिबंधक औषधे उपलब्ध करून देण्यात मोलाचे सहकार्य केले तसेच बापूसाहेब गायकवाड, सर्पमित्र निखिल पाटील, गोविंद शिंदे, विठ्ठल सालमुठे, डॉ पवन बडोदे,डॉ अमोल बढे,लक्ष्मण सांगळे,यांचेही सहकार्य मिळाल्याची भावना डॉक्टर श्रीकांत काकड यांनी व्यक्त केली.

डॉक्टरही भावूक

माझ्या वाढदिवसाचा केक आज जयश्रीच्या हातून कापला कारण जन्मदिवसाची खरी हक्कदार तीच होती. आज १० दिवसांनी जयश्री घरी गेली ती बरी होण्यात माझे आई वडील,कुटूंबीय कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य मिळाल्याने मी जयश्रीचे प्राण वाचवू शकलो.

डॉक्टर श्रीकांत काकड (साई सिद्धी हॉस्पिटल येवला)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!