Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या सेल्फी हिट-चाट

हलकं फुलकं लिखाण पसंतीस उतरतं; दिग्दर्शक समीर पाटील यांच्याशी साधलेला संवाद

Share

नाशिक | प्राजक्ता नागपुरे

यंदा महाराष्ट्रावर वरुणराजाची कृपादृष्टी असली तरी काही भाग मात्र पावसाळ्यातही दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. मराठवाड्यासारख्या भागातील एका कुटुंबातील आईला पाण्याच्या कमतरेसोबत एक आगळीवेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. या आईच्या वय पार केलेल्या चार मुलांचे काही केल्या लग्न जमत नाहीये. सोनी मराठीवर नव्याने सुरु होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेतून प्रेक्षकांना ह्या आईची व्यथा पाहावयास मिळणार आहे. ‘आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे’, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलाने  डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं सहन करून या वर्षी आपल्या मुलांची लग्ने लावणारच, असा निश्चय आईने केला आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रयोगशील दिग्दर्शक समीर पाटील नवी मिळे नवऱ्याला मालिकेचे दिग्दर्शन करणार असून, या निमित्ताने त्यांच्याशी केलेली खास बातचीत… पोश्टर बॉईज, पोश्टर गर्ल, शेंटिमेंटल, इयर डाऊन अशा नावाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक समीर पाटील प्रेक्षकांना कायमच नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत असतात. अनेक चित्रपटानंतर नवरी मिळे नवऱ्यालाच्या निमित्ताने मालिका दिग्दर्शनात उतरलेले समीर पाटील नेहमीच्या मराठी मालिकांच्या संकल्पनेला फाटा देत सामाजिक प्रश्न मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडतांना दिसतील.

मालिकेचे वेगळेपण 

अनेकदा मराठी मालिकांमध्ये श्रीमंत नायिका, गरीब नायक, त्यांच्यातील जातीभेद, विवाहबाह्य संबंध, नायक-नायिकेचे प्रेम मात्र लग्नास विरोध अशा ‘सेट पॅटर्न’ वर भर दिला जातो. नवरी मिळे नवऱ्यालाचे वेगळेपण मात्र त्यातील तरुणांचे लग्न ‘का’ जुळत नाही यामध्ये आहे. मराठवाडा, विदर्भसारख्या भागात पिण्याच्या पाण्याची देखील  टंचाई असतांना पाण्याअभावी शेती ओस पडू लागली आहे. त्यामुळे या भागातील तरुणांना सुशिक्षित असूनही केवळ शेतकरी असल्याने लग्नासाठी मुली मिळत नाही, हे या भागाचे वास्तव.

आधी प्रत्येकाला मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थायिक व्हायचे असते, मग जे तरुण प्रामाणिकपणे शेती करतात त्यांचे काय, हा गंभीर प्रश्न रोचक पद्धतीने या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवण्यात येईल. अजय भालवणकरांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही मालिका नेहमीसारखी सरधोपट डेलीसोप नसून हलक्या फुलक्या पद्धतीने एक सामाजिक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवेल, असे वाटल्याने ही  मालिका स्वीकारल्याचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी सांगितले. ही मालिका महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या अनेक वाहिन्यांवर असंख्य डेलीसोप सुरु आहेत, पण मालिकेतून समाजाचा आजचा प्रश्न हेरून काहीतरी दाखविले पाहिजे, हा विचार मनात येणे आणि त्या दृष्टीने भालवणकरांनी प्रोत्सहन देणे, हे मालिकेचे बलस्थान असल्याचे समीर पाटील सांगतात.

शेतकरी तरुणांची परिस्थिती बदलेल

महाराष्ट्राची शेती पूर्णपणे नैसर्गिक असल्याने काही भागात आजही शेती करतांना अनेक अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो, त्यामुळे शेतीबद्दलच्या अनेक नकारात्मक बातम्या रोज कानावर येतात. व त्यावर विश्वासही बसतो. त्यामुळे आजही अनेक मुलींना शेतकरी मुलगा म्हंटला की धास्ती वाटते.

मालिकेतील नायिका याच तरुणींचे चित्र दाखवितात. यामध्ये नाईलाजाने शेतकऱ्याशी लग्न करणारी नायिका जेव्हा प्रत्यक्ष वास्तव बघते, त्यावेळी तिला शेतीचे महत्व कळते, व ती स्वतःहून तिच्या नवऱ्याला शेतीकामात मदत करू लागते. या मालिकेतील कथानक उलगडतांना अनुभवातून प्रगल्भ झालेली नायिका आजच्या शेतकरी तरुणाविषयीचे अनेक गैरसमज दूर करू शकेल, गोष्ट पुढे सरकत जाताना अनेक पात्रांच्या नकारात्मक विचारांचे सकारात्मक परिवर्तन समाजातील आजच्या तरुणींच्या जाणिवांचे प्रतिनिधित्व करेल, अशा विश्वास समीर पाटील व्यक्त करतात.

आव्हानांचा सामना

पहिल्यांदाच मालिकेचे तंत्र हाताळतांना आलेल्या आव्हांनाविषयी विचारले असता पाटील म्हणाले, “गोष्ट माहिती होती, कोठे पोहचायचे हे माहिती होते त्यामुळे वास्तविक  परिस्थितीवर भाष्य करणारे कथानक विनोदी शैलीने रचतांना सुदैवाने कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, कथानकातील गमतीजमती प्रेक्षकांना नक्कीच आवडतील”.

मालिकेतील पात्रांविषयी

नवरी मिळे नवऱ्याला मालिकेतील प्रत्येक पात्राचे स्वतःचे असे वेगळेपण आहे. सर्व पात्र प्रेक्षकांना त्यांच्या घरातील, जवळपास असणारी वाटतील. मालिकेत दाखविण्यात आलेल्या कुटुंबातील आई म्हणजे रुख्मिणी हे पात्र विशेष आहे. रुख्मिणी प्रेक्षकांच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या घरातील खंबीर स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. प्रत्येक यशस्वी कुटुंबात एक खमकी स्त्री असते, जी त्या कुटुंबाला तोलून धरते ती स्त्री म्हणजे रुख्मिणी पाहून प्रत्येकाला आपल्या घराचा कान असणारी स्त्री आठवेल. रुक्मिणीचा नवरा हे पात्र तितकेच मजेशीर आहे. घरातील चार मुले, मालिकेत पुढे  नव्याने येणाऱ्या एक एक व्यक्तिरेखा, सगळ्यांचा स्वभाव, शैली दुसऱ्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे एकाच मालिकेत वैविध्यपूर्ण पात्र प्रेक्षकांना भेटतील. कथानकाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ही पात्रे अशी का आहेत, हा प्रश्न मजेशीर पद्धतीने सुटत जाणार आहे.

मालिका रटाळ होणार नाही, यासाठी कथानकाचा ग्राफ राखणे महत्त्वाचे

प्रेक्षकांना फक्त वेगळं आणि तर दर्जेदार देण्याचा डिफाइन आर्ट प्रा. लि. च्या नरेंद्र राहुरीकर यांचा प्रयत्न असल्याने मालिका शेवटपर्यंत रंजक राहील व सुरवातीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करेल यावर, समीर पाटील व त्यांच्या सोबतचे लेखक चारुदत्त भागवत आणि आशुतोष भालेराव यांनी भर दिलेला आहे. टीआरपीची गणिते प्रेक्षकांच्याच पसंतीवर ठरतात. त्यामुळे मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा मालिकेच्या संपूर्ण टीमचा प्रयत्न राहील.

सध्याच्या मराठी मालिकांचा लेखन दर्जा:

आजच्या मराठी मालिका लेखनाविषयी बोलतांना पाटील म्हणतात, मराठी सिनेक्षेत्रात अनेक चांगले लेखक आहेत. मात्र मालिकेच्या कामाचे सूत्र सांभळतांना  ना जे विकल्या जाते तेच लेखकाला लिहावे लागते. त्यामुळे लेखनात तोच तोचपणा येऊ शकतो. पिंपळपान सारख्या जुन्या मालिकांच्या कथा साहित्यातून निर्माण व्हायच्या, कारण त्याकाळी प्रेक्षकांना ते पाहायला आवडत होते. आता मात्र जास्तीत जास्त हलकं-फुलकं बघण्याकडे कल असतो.त्याप्रमाणे मालिका लिहितांना प्रेक्षकांना काय आवडतं याचा विचार करून लेखकाला लिहावे लागते. टीव्ही क्षेत्रासाठी लिहितांना लेखकाला तडजोड करावी लागते मात्र या तडजोडीकडे आव्हान म्हणून बघावयास हवे.

तरुण प्रेक्षकाला मालिका बघण्याकडे वळविणे आव्हानात्मक :

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम सारख्या माध्यमांवर रमलेल्या तरुणाईला पुन्हा मालिकांकडे वळविणे दिग्दर्शक म्हणून आव्हानात्मक वाटते.  इंटरनेटवरील माध्यमांवरील आशयाला  कोणत्याही प्रकारचे बंधन नसते त्यामुळे तरुण वर्ग त्याकडे आकर्षित होतो. टीव्हीवरील कार्यक्रमांवर मात्र अनेक मर्यादा असतात. समाजात अनेक गैरप्रकार चालतात, टीव्हीवर मात्र संस्कृतीच्या गप्पा चालतात, हा आपल्याच समाजाचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा कायम मध्यमवयीन असतो. अशा परिस्थितीत टीव्ही मालिकेचा तरुण प्रेक्षक राखणे, अवघड झाल्याचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी सांगितले.

आगामी प्रोजेक्ट्स:

समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यात मराठी प्रेक्षकांसाठी खास ‘सरप्राईज’ असल्याचे सांगत चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली आहे. ‘विकून टाक’ मध्ये ऋषिकेश जोशी यांसोबत काही नवीन चेहरे मराठीसिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!