लग्नसमारंभात सत्काराला फाटा देत जनावरांच्या चाऱ्यासाठी दिली २१ हजारांची देणगी

0
सिन्नर । लग्न सोहळा म्हटले की, पाहुण्यांचे मानसन्मान करताना वधू आणि वरपक्षाची दमछाक होते. टोपी-टॉवेलचा जमाना काहीसा मागे पडून आता तुरेदार फेटे बांधून पाहुण्यांचे आगत स्वागत करण्याची प्रथा आता रूढ होत आहे.
मात्र, लग्न लागल्यावर घराकडे परतताना वधू-वर पित्याने सन्मान म्हणून दिलेले हेच फेटे जागोजागी पडून सोहळ्याची शोभा वाढवताना दिसतात. पाहुण्यांच्या मान सन्मानावर होणारा हा खर्च वायफळ असल्याची जाणीव असून देखील नको कोणी नाव ठेवायला म्हणून सोहळ्याचे यजमान असणारे वधू-वर पिते या खर्चाला हात आखडता घेत नाहीत.
तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील एका विवाहसोहळ्यात मात्र हा फेटे-टोप्या घालण्याचा मानसन्मान बाजूला ठेवण्यात आला.  वरपित्याकडून यासाठी खर्च होणारी सुमारे २१ हजार रुपये रक्कम सिन्नर येथील गोशाळेतील भाकड जनावरांच्या व्यवस्थेसाठी देणगी म्हणून देण्यात आली.
नांदूर शिंगोटे येथील प्रतिथयश व्यावसायिक रामदास व विलास खंडू सानप यांचा भाचा व सामान्य शेतकरी असणारे राहुरी ता. नाशिक येथील चंद्रकांत काशिनाथ सांगळे यांचा मुलगा मंगेश याचा विवाह संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील रामनाथ चकोर यांची कन्या रुपाली हिचेसोबत नांदूरशिंगोटे येथील एकविरा लॉन्सवर नुकताच पार पडला.
या विवाह सोहळ्यासाठी वधू-वर पक्षाकडील पाहुणे मंडळी उपस्थित होती. मात्र या पाहुण्यांचे स्वागत करताना कुठेही सत्काराचा बडेजाव दिसत नव्हता. गुलाबपुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत होते. स्वागताला फेटा अन टोप्या नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या देखील.
मात्र तेवढ्यात निवेदकाने सर्वांना सुखद धक्का देणारी व तेवढीच अनपेक्षित घोषणा केली. सत्कारानंतर मंडपात सर्वत्र पडलेल्या टोप्या आणि फेटे यामुळे शोभा होण्यापेक्षा यासाठीचा खर्च सकारात्मक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय या सोहळ्यात वधुवर पित्यांसह वराच्या मामांनी एकत्रित चर्चा करून घेतला होता.
सत्कारावर होणारी सुमारे २१ हजार रुपये ही रक्कम सिन्नर येथील कै.गंगाधरदादा चोथवे चॅरिटेबल ट्रस्ट ला देण्यात येत असल्याचे निवेदकाने संगितले. नाशिक-पुणे महामार्गालगत माळेगाव शिवारात या ट्रस्ट मार्फत हरिओम गोशाळा चालवली जाते.
सुमारे ३०० भाकड गायींचा सांभाळ येथे करण्यात येतो. शहरातील व्यावसायिक राहुल व संजय चोथवे हे भाऊ स्वतःच्या शेतात हि गोशाळा चालवत असून समाजाच्या दृष्टीने निरुपयोगी असणाऱ्या गायींची या गोशाळेत पदरमोड करून सेवा केली जाते. चोथवे बंधूंच्या सामाजिक कार्याला हातभार लागावा व गोसेवेचे पुण्य पदरी पडावे या हेतूने सांगळे यांनी मुलाच्या लग्नात पाहुण्यांच्या मानसन्मानवर खर्च होणारी रक्कम चोथवे चॅरिटेबल ट्रस्टला देणगी स्वरूपात दिली.
या अनोख्या उपक्रमाबद्दल विवाहसोहळ्यासाठी उपस्थित नातेवाईक व पाहुण्यांनी उभय परिवारांचे कौतुक केले. वधूवरांवर अक्षतारूपी आशीर्वादाचा वर्षाव झाल्यावर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल चोथवे, उपाध्यक्ष महेंद्रकुमार तारगे यांच्याकडे सभामंडपातच २१ हजार रुपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली.
 विनायकराव शेळके, आनंदराव शेेळके, सजन सानप, विकास चकणे, बाजीराव शेळके, संपत सानप, भाऊसाहेब वाळके, रामदास सानप, विलास सानप आदींसह नातेवाईक येवेळी उपस्थित होते.
अनुकरण करण्याची गरज 
लग्नात यजमानाने टोपी-टॉवेल दिला नाही, फेटा बांधला नाही म्हणून अनेकदा मान-अपमान नाट्य रंगते. अशावेळी रुसलेल्या पाहुण्याची समजूत काढण्यासाठी वधू-वर पक्षाला नाक घासावे लागतात. नको कुणाचा रुसवा म्हणून बिचारे यजमान कधीकधी परिस्थिती नसताना देखील सत्काराचा बडेजाव मिरवताना दिसतात. लग्न सोहळा आटोपल्यावर त्याच यजमानांना परिसरात अस्ताव्यस्त पडलेले फेटे, टोप्या गोळा कराव्या लागतात.
पुन्हा वापर होत नसल्याने कचऱयाच्या कुंडीत या टोप्या- फेटे फेकावे लागतात. काही तासांच्या बडेजावासाठी प्रत्येक यजमानाला यासाठीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ऐपतीनुसार एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी, गावातल्या शाळेसाठी देणगीरूपात मदत दिली गेली तर तो विवाहसोहळा देखील सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहणारा ठरेल. मात्र त्यासाठी सामाजिक पुढाकारासोबतचा सांगळे कुटुंबीयांचा आदर्श घेऊन त्यापद्धतीने अनुकरण करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*