Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

प्रवासी म्हणून बसायचे आणि गाडीच चोरून न्यायचे

Share

नाशिक | इगतपुरी, गोंदे परिसरात प्रवासी असल्याचे भासवत गाडीत बसत असायचे. गाडी निर्जनस्थळी गेल्यानंतर चाकूचा धाक दाखवत वाहनासह रोख रक्कम घेऊन पोबारा करणाऱ्या चार ते पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव येथे केलेल्या धडक कारवाईत जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दहा दिवसांत दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणल्यानंतर पथकाच्या कामगिरीवर खूश होत अधीक्षकांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

अधिक माहिती अशी की, 04 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोंदे एम.आय.डी.सी. परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीचे पिक अ‍ॅण्ड ड्रॉप सर्व्हीस करणारा चालक जगदिश मौर्या (वय 21, राबनारस, उत्‍तरप्रदेश हा नाशिक शहरातील व्दारका परिसरात कंपनीच्या कर्मचा-यांना सोडण्यासाठी गेला होता. परतत असताना पाथर्डी फाटा परिसरातुन इगतपुरी येथे जाण्यासाठी चार ते पाच जण प्रवासी म्हणुन बसले.

त्यानंतर चालकाने इगतपुरीकडे गाडी मार्गाला लावली. गोंडे एमआयडीसी परिसरात राखाडी रंगाची स्विफ्ट कार जबरदस्तीने थांबवत चाकुने त्याच्या कंबरेवर व अंगावर गंभीर दुखापत केली. स्विफ्ट कार व रोख रूपये लुटमार करत वणी सापुतारा रस्त्याकडे पोबारा केला. त्यानंतर चालकाचे हात पाय आणि डोळ्यावर रुमाल बांधून त्यास रस्त्यावर सोडून दिले.

याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला आठवडाच उलटला असतानाच गोंदे परिसरातील ग्लोबल कपंनीचा चालक राजेंद्र लक्ष्मण खताळे, वय 45, रा. वैतरणा, ता.इगतपुरी यांचेकडील पिक अ‍ॅण्ड ड्रॉप सर्व्हिससाठी असलेली सफेद रंगाची स्कॉर्पिओ कार 10 जानेवारी रोजी अज्ञात संशयितांना चालकाच्या अंगावर चाकुचे वार करून गाडी पळवली.

या चालकासही वणी सापुतारा रोडवर टाकून दिले. याप्रकरणी वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहने एकाच परिसरातून गेली, पुन्हा चालक एकाच ठिकाणी टाकले गेले. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे आव्हान वाढले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हयातील चेक पॉईंट व महामार्गावरील नाकाबंदी पथकांना सतर्क गस्त घालणेबाबत सुचना दिल्या व गुन्हे उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन केले.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्यास प्रारंभ झाला. याबाबत फिर्यादीकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानुसार संशयित नाशिक औद्योगिक वसाहतीत काम करणारे असावेत असा तर्क लावला.

त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लुटून नेलेली महिंद्रा स्कॉर्पिओ कार क्र. एम.एच15 ई.एक्स.8063 ही मालेगाव शहरात काही संशयित घेऊन आल्याचे समजले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भायगाव परिसरातील पॉलीटेक्नीक कॅालेज परिसरात सापळा रचला. संशयितांना चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी गाडीचा पाठलाग करून पाच संशयितांना स्कॉर्पिओसह संदिप उर्फ बबल्या अभिमन बनगर, वय 23, रा. कंकराळे, ता.मालेगाव, हल्ली
चुंचाळे शिवार, नाशिक 2) समाधान रमेश वाघ, वय 19, रा. कंकराळे, ता.मालेगाव हल्ली कुमावत नगर, पेठरोड,
नाशिक, 3) उमेष नामदेव मासुळे, वय 24, 4) अरूण विठोबा सुर्यवंषी, वय 20, 5) भुशण विठोबा खेमनार, वय
20, तिघे रा. कंकराळे, ता.मालेगाव यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आठवड्याभरात नाशिक शहर ते गोंदे एम.आय.डी.सी. परिसरात एक मारूती स्विफ्ट व एक स्कॉर्पिओ कारमध्ये प्रवासी म्हणुन बसुन चालकांना चाकुने गंभीर जखमी करून लुटमार केल्याची कबुली दिली.

हा गुन्हा करण्यासाठी सहावा साथीदार अनिल पाटील, रा. गौताणे, ता.जि.धुळे हा देखील त्यांच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले.

ताब्यात घेतलेला संशयित संदिप उर्फ बबल्या बनगर, समाधान वाघ व त्यांचा साथीदार अनिल पाटील हे अंबड एम.आय.डी.सी. परिसरातील जे.बी.एफ. व साईकृपा कंपनीमध्ये कामकाज करत होते.

यातील समाधान वाघ हा कंपन्यांमधील मालाची देवाणघेवाण करण्याकरीता एका वाहनावर चालक म्हणुन कामकाज करत होता.

त्यास विविध कंपन्यांमधील वाहनांचे कामकाजाबाबत माहिती होती. त्याने त्याचे इतर साथीदारांसह गेल्या
महिनाभरापासुन प्लॅन रचुन पिक अ‍ॅण्ड ड्रॉप करणारे वाहनांची चोरी करून विक्री करायची व पैसे वाटून घ्यावयाचे असा कट रचला.

त्यानुसार सर्वांनी गोंदे एम.आय.डी.सी. परिसरातील जिंदाल व ग्लोबल कंपनीचे पिक अ‍ॅण्ड ड्रॉप करणारे वाहन चालकांना चाकुने दुखापत करून वरील गुन्हयातील स्विफ्ट व स्कॉर्पिओ कार लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर संशियातांच्या ताब्यातून स्कर्पिओ, एक जिओ कंपनीचा मोबाईल व एक व्हिवो कंपनीचा मोबाईल असे 02
फोन, गुन्हयात वापरलेले हत्यार एक चॉपर व एक वक्राकार सुरा असा एकुण 4 लाख 57 हजार 500 रू. किंमतीचा
मुद्देमाल हस्तगत केला.

याच गुन्ह्यातील स्विफ्ट कार क्र. एम.एच15 ई.एक्स.8131 ही चांदवड परिसरात मिळुन आली असुन वरील जप्त मुद्देमाल व ताब्यात घेतलेल्या संशयितांना वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.

या गुन्हाची उकल पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. निलोत्पल यांच्या मार्गदर्शन आणि सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे, सपोनि संदिप दुनगहु, सपोउनि सुनिल आहिरे, पोहवा वसंत महाले, सुहास छत्रे, राजु मोरे, दिपक आहिरे, दत्‍तात्रय साबळे, पुंडलीक राउत, गणेश वराडे, पोना देवा गोविंद, चेतन संवत्सरकर, राकेश उबाळे, अमोल घुगे, प्रविण सानप, पोकॉ रतिलाल वाघ, फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने कामगिरी केली.

पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक दराडे यांनी 10 हजार रूपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!