Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकद्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा; जिल्ह्यातील सुमारे ४० शेतकऱ्यांना घरघर

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा; जिल्ह्यातील सुमारे ४० शेतकऱ्यांना घरघर

पंचवटी | वार्ताहर

नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परप्रांतीय व्यापाऱ्याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करीत संशयित व्यापाऱ्याने कोट्यवधी रुपयांचा द्राक्षमाल खरेदी करताना थोडीशी रोख रक्कम आणि उर्वरित मोठ्या रकमेचे धनादेश दिले आहे.

- Advertisement -

यानंतर शेतकऱ्यांनी धनादेश बँकेत टाकले असता ते वटलेच नाही. यानंतर मात्र दोन दिवसांपासून या व्यापाऱ्याचा संपर्क होत नसल्याने या सर्व शेतकऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्त कार्यालय गाठत तेथे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील उमराळे, म्हसरूळ, मखमलाबाद, पिंपळगाव बाहुला, दरी-मातोरी, बोपेगाव, आंबेवणी, धागुर यासह इतर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. यातील संशयित व्यापारी मेवालाल सुखराम गुप्ता(रा. रोहिणी नगर, पेठरोड, मूळ राहणार बिहार ) हा गत सात ते आठ वर्षपासून पंचवटीतील पेठफाटा येथे राहत आहे.

यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील या व्यापाऱ्यास द्राक्षाची विक्री केली आहे. त्यावेळी मेवालाल याने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे दिले आहे. अश्या प्रकारे विश्वास संपादन करीत या व्यापाऱ्याने गेल्या महिन्यात या सर्व द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांशी संपर्क साधत शेतमळ्यात, पेठफाटा येथील घरी तसेच शरदचंद्र पवार मार्केट मध्ये व्यवहार करीत द्राक्षाची खरेदी केली.

यात एकूण ठरलेल्या रकमेपैकी केवळ ४० ते ५० हजार रुपये रोख स्वरूपात दिले आणि इतर रकमेचे धनादेश दिले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी संपर्क साधत चेक बँकेत टाकण्याबाबत विचारणा केली असता या व्यापाऱ्याने चेक टाकू नका असे सांगत पैसे देण्याचे आश्वासन दिले.

तर काहींनी धनादेश बँकेत टाकले असता वटलेच नाही. या सर्व प्रकारामुळे भेदरलेल्या शेतकऱ्यांनी बुधवार पासून व्यापाऱ्याशी संपर्क साधला असता झाला नाही. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी पेठफाटा येथील घरी जाऊन बघितले असता घराला देखील कुलूप असल्याचे दिसून आले. यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनि एकमेकांशी संपर्क साधून पैसे मिळाले का या बाबत चौकशी केली असता त्यांचा देखील दोन दिवसांपासून संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली.

यानंतर सर्व शेतकरी एकत्र आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र पंचवटी पोलिसांनी त्यांची दखल न घेतल्याने या सर्व शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठत तेथे तक्रार अर्ज केला आहे. दुसरीकडे याच प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत फसवणूक झालेले काही शेतकरी पंचवटी पोलीस ठाण्यात थांबून होते.

फसवणूक झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांना संशयीत व्यापाऱ्याने एकूण रकमेपैकी केवळ ४० ते ५० हजार रुपये रोख दिलेआहे . उर्वरित रकमेचे धनादेश दिले असून काही शेतकऱ्यांना धनादेश वटलेच नाही तर काहींना ते वटण्याची शास्वती नसल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे. ही सगळी फसवणूक सुमारे कोटींच्या घरात असल्याची माहिती फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

तसेच या बाबत पंचवटी पोलिसांना माहिती देऊन देखील त्यांनी दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेत तक्रार अर्ज दिला. पंचवटी पोलिसांनी अशी वागणूक दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या