Photo Gallery : बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्‍न तात्काळ सोडवू : पालकमंत्री महाजन

0
नाशिक । नाशिक नगरीला निसर्ग, आल्हाददायी हवामान, मुबलक पाणी यांचे वरदान लाभले आहे. येथील धार्मिक, सांस्कृतिक वातावरणही अत्यंत चांगले असून सर्वाथाने सुंदर, समृद्ध असलेल्या गोदानगरीत स्वत:चे घर असावे असे असे प्रत्येकालाच वाटते.

प्रापर्टी एक्स्पोमधून घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तम माध्यम आहे. बांधकाम व्यावसायिकांंचे अनेक महत्वपूर्ण निर्णय, समस्या प्रलबिंत आहेत. अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या विकास नियमावली, पाणीप्रश्‍न यासह इतर सर्व प्रश्‍न येत्या दोन महिन्यात मार्गी लाऊ असे आश्‍वासन जलसंपदामंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

गंगापूर रोड वरील डोंगरे वसतिगृह मैदानावर क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टीएक्स्पो-2018 प्रर्दशनाचे उद्घाटन केल्यानंंतर महाजन बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, आ. योगेश घोलप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव सुनिल कोतवाल उपस्थित होते. पालकमंत्री महाजन यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल गौरवोद‍्गार काढले आणि शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांंबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत येत्या मंगळवारी (दि.25) होणार्‍या बैठकीत मुद्दे मांडणार असून दोन महिन्यात डिसीआर (विकास नियंत्रण नियमावली) ऑटो डिसीआर आणि इतर प्रलबिंत फाईल्सचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु. यासाठी नाशिकच्या व्यावसायिकांनीही वेळोवेळी पाठपूरवा करावा असे त्यांनी सांगितले.

राजकारण्याच्या हातात जादूची कांडी असल्याचे सांगत, उमेश वानखेडे यांनी राजकीय नेतृत्वाने यामध्ये लक्ष घालून समस्या मार्गी लावाव्यात असे सांगितले. बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सांगून दिल्ली-मुबंई इंडस्ट्रीयल कॉरीडोरमध्ये नाशिकचा समावेश, समृद्ध महामार्गालत जागेची उपलब्धता हे आणि इतर प्रश्‍न मार्गी लावण्यासंबंधी त्यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले.

नाशिकची इत्यंभूत माहिती, बलस्थाने, क्षमता, सांख्यिकीय आकडेवारी, तथ्ये, नागरिकांची रुची याचा सखोल व शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी क्रेडाई नाशिक देशात प्रथमच विश्‍वाहार्य अहवाल देणार्‍या कंपनीला पाचारण करणार आहे अशी माहीतीही त्यांनी दिली.

एकाच छताखाली बांधकाम व्यावसायिकांचे विविध गृहपर्याय, अर्थ साहाय करणार्‍या वित्तीय संस्था, बँकाचे स्टॉल प्रदर्शनात उपलब्ध होणार असल्याचे सांगून प्रदर्शनाचे समस्वयक अनिल आहेर यांनी ग्राहकांना ही गृहस्वप्नपूर्तीसाठी योग्य वेळ असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.

प्रारंभी क्रेडाईच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक पर्यटन केंद्राची ‘बॅ्रडिंग’करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे पाच लाखांचा धनादेश पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

सूत्रसंचलन ‘देशदूत टाईम्स’च्या संपादिका वैशाली बालाजीवाले यांनी केले. आभार प्रदर्शन सहसमन्वयक ऋषिकेश कोते यांनी मानले. याप्रसंगी मानद सचिव कृणाल पाटील, उपाध्यक्ष रवी महाजन, अतुल शिंदे, राजेश पिंगळे, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर यांच्यासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*