Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

गोवर्‍यांमध्ये पार पडतो अंत्यसंस्कार; दोन झाडांची वाचते कत्तल

Share

नाशिक । प्रतिनिधी

* एका मयतासाठी लागतात 600 ते 700 गोवर्‍या
* 12 ते 15 वर्षांच्या दोन झाडांची वाचते कत्तल
* ग्रामपंचायतींना आवाहन

पंचवटी अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी गोवर्‍यांचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी केला जात आहे. आतापर्यंत सहा ते सात मयतांचे अंत्यविधी या पद्धतीने करण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांकडूनदेखील या पद्धतीला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती गोसेवक रमेश मानकर यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

भारतात अनेक धर्मांमध्ये मयताला अग्नी देऊन पंचतत्त्वात विलीन करण्याची परंपरा आहे. अपवाद वगळता सर्वच मृतदेहांना लाकडाची चिता रचून अग्नी दिला जातो. यासाठी १२ ते १५ वर्षे वयाची किमान दोन झाडे तोडली जातात.

२१ फेब्रुवारी २०१८ रोजी याबाबत महापालिकेला गोवर्‍यांचा वापर करून अंत्यविधी व्हावेत याबाबत पत्र देण्यात आले होते. यात महापालिकेने सकारात्मकता दाखवली होती. येणार्‍या काळात गोवर्‍यांचा वापर वाढावा यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. याद्वारे मोकाट जनावरांचे संगोपनही होईल तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगारदेखील मिळेल.

महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, मध्य प्रदेशात छिंदवाडा या शहरात कित्येक वर्षांपासून गोवर्‍यांनी अंत्यविधी करण्याची प्रथा चालत आली आहे. नागपूर शहरानेसुद्धा या प्रथेला दोन वर्षांपूर्वी स्वीकारले. पर्यावरणप्रेमी सुजाण नागरिकांनी त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसारही सुरू केला आहे. नाशिकमध्येही आतापर्यंत पाच ते सहावेळा गोवर्‍या, कापूर आणि तुपात मयताचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अंत्यसंस्कारादरम्यान लाकडे नसल्याचे बघून अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या. मात्र यातून पर्यावरणाचा कुठलाही र्‍हास न होता शेणातील २३ टक्के प्राणवायू, ६० टक्के मिथेनचा योग्य वापर होत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच जळणार्‍या राखेपासून ४६.६ टक्के प्राणवायू निर्माण होतो. लाकडापासून निघणार्‍या धुरापेक्षा गोवर्‍यातून निघणारा धूर जास्त प्रदूषण करत नाही. तसेच गोवर्‍यांच्या धुरामुळे वातावरणातील विषारी जीवजंतू नष्ट होतात, अशी माहिती जेव्हा दिली जाते तेव्हा सकारात्मक प्रतिसाद मृताच्या नातेवाईकांकडून मिळतो.

रोजगार मिळेल
शेणाच्या गोवर्‍या बनवण्यासाठी ग्रामीण महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होऊ शकते. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन महिला सबलीकरणाचा मार्ग सोपा हाईल. हा अपारंपरिक ऊर्जास्त्रोत असल्यामुळे कार्बन फूटप्रिंट ला आळा बसण्यास योगदान मिळणार आहे. तसेच लयास जात असलेल्या बचतगटांना सामावून घेत शासनाच्या मदतीने बचतगटांनाही नवा आशेचा किरण याद्वारे मिळू शकतो.

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी प्रयत्न
एका मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ६०० ते ७०० गोवर्‍या लागतात. २५० ग्रॅम कापूर तसेच अर्धा किलो तूप लागते. यामध्ये संपूर्ण अंत्यविधी पूर्ण होते. यात लाकडाचा कुठेही वापर केला जात नाही. त्यामुळे हा पर्यावरणाला पूरक असा विधी पार पडतो. महापालिकेसोबच ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींनी ठराव करून अंत्यविधीसाठी गोवर्‍यांचा वापर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
– रमेश मानकर, गोसेवक नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!