Friday, April 26, 2024
Homeनाशिकआरोग्यमंत्र्यांचे  आश्वासन हवेत;  टेस्टिंग लॅबला मिळेना किट; धुळे व पुण्याला स्वॅब पाठविण्याचे...

आरोग्यमंत्र्यांचे  आश्वासन हवेत;  टेस्टिंग लॅबला मिळेना किट; धुळे व पुण्याला स्वॅब पाठविण्याचे गौडबंगाल काय?

प्रशासनात चेंडू टोलवा टोलवी

नाशिक । कुंदन राजपूत

मविप्रच्या डाॅ.वसंतराव पवार मेडिकल काॅलेज टेस्टिंग लॅबला सर्व साहित्य पुरवले जाईल हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेले आश्वासन त्यांनी पाठ फिरवताच हवेत विरले आहे. दिवसाला २६० स्वॅब तपासणीची क्षमता असतांना गुरुवारी (दि.१४) किटस् व इतर साहित्यअभावी लॅबमध्ये फक्त १५० स्वॅबची तपासणी होऊ शकली. क्षमता असताना देखील किट व साहित्य मिळत नसल्याने जिल्ह्यातील स्वॅब धुळे व पुण्याला पाठवायला लागत आहे. कीट व इतर साहित्याच्या पुरवठयाबाबत जिल्हाप्रशासन व जिल्हा रुग्णालय जबाबदारी झटकत असून ऐकमेकांकडे बोट दाखवत अाहे.

- Advertisement -

नाशिकला करोना टेस्टिंग लॅब झाल्यास करोनाचे निदान त्वरित होऊन करोना संसर्गाला अटकाव घालता येईल ही आशा फोल ठरली आहे. दहा ते २५ लाख खर्च करुन मविप्रच्या डाॅ.पवार मेडिकल काॅलेजमध्ये करोना टेस्टिंग लॅबचा सेटअप उभारण्यात आला. दिवसाला तीन शिपमध्ये २६० स्वॅब तपासणीची क्षमता आहे. मात्र, जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयातील समन्वयाच्या अभावामुळे टेस्टिंग लॅबला स्वॅब तपासणीसाठी आवश्यक किटस् व केमिकल साहित्यचा पुरवठा होत नाही.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टेस्टिंग लॅबला बुधवारी (दि.१३) भेट दिली होती. यावेळी त्यांनी लॅबला स्वॅब तपासणीसाठी आवश्यक सर्व किट पुरवले जाईल असे सांगितले होते. मात्र दुसर्‍या दिवशी देखील पुरेशा प्रमाणात कीट उपलब्ध न झाल्याने १५० स्वॅबची तपासणी झाली. किटस् व इतर आवश्यक साहित्य खरेदीची टेंडर प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविली जाते.

साहित्य प्राप्त झाल्यावर जिल्हा रुग्णालयाला ते दिले जाते. त्यांच्याकडून टेस्टिंग लॅबला हे साहित्य गरजेनुसार पुरवले जाते. मात्र, अपुर्‍या प्रमाणात  खरेदी प्रकिया  राबविली जात आहे. त्यामुळे उपलब्ध साहित्याचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे टेस्टिंग लॅबची क्षमता असताना देखील मालेगावचे स्वॅब धुळे व पुण्याला पाठवले जात आहे. एक स्वॅब तपासणीला दोन हजार रुपये इतका खर्च येतो. शिवाय पुणे व धुळयाला स्वॅब पाठवल्यामुळे निदान होण्यास विलंब होत असून वेळेचा अपव्यय होत आहे.


मविप्रच्या लॅबला फक्त १०५ स्वॅब तपासणीसाठि दिले आहे. मालेगावचे स्वॅब धुळे व पुण्याला पाठवले आहे. साहित्य खरेदि प्रक्रिया जिल्हाधिकारी राबवतात. टेस्टिंग लॅबला आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले जाते.

– डाॅ.सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक


स्वॅब तपासणीसाठी २४ प्रकारचे मटेरियल लागते. आम्हाला जेव्हा पूर्ण साहित्य दिले तेव्हा २४४ स्वॅब एका दिवसात आम्ही तपासले. मात्र, जिल्हा रुग्णालयाकडून अपुरे मटेरियल दिले जाते. साहित्य पुरवावे यासाठी जिल्हा रुग्णालयाला आतापर्यंत २० ते २५ पत्र लिहून झाले आहे. मात्र तरी देखील साहित्य पुरवले जात नाही. या सर्व प्रकारामुळे टेस्टिंग लॅब पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही अशी आमची बदनामी केली जात आहे.

डाॅ.मृणाल पाटिल, डिन
डाॅ.वसंत पवार मेडिकल काॅलेज


मागील आठवड्याभरात बराच प्रयत्न करून आपण स्वाब पेंडेन्सी बहुतांश संपवत आणली आहे. MVP मध्ये सुधा 150 च्या वरच तपासणी होत आहेत. ती लॅब निरंतर सुरू रहावी म्हणून डॉ लाहाडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते लॅब संदर्भातील सर्व विषय यापुढे हाताळतील. सर्व सामग्री सुद्धा वेळेत पुरवली जाईल याबाबतही ते दक्षता घेतील व त्यांचेवर जिल्हा शल्य चिकित्सक यांचे पर्यवेक्षण राहील.  दरम्यान, नवीन डिस्चार्ज पॉलिसी प्रमाणे आता स्वाब घेण्याच्या प्रमाणातच मुळात जवळपास 50% घट झालेली असल्याने आता रिपोर्ट्स अधिक वेळेत मिळू शकतील असे वाटते.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या