कोरोना : आतापर्यंत ११८ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित; कोरोनाबाधित रुग्णांच्या ९२ नातेवाईकांचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या ९२ नातलगांचे घशाचे स्राव घेऊन तपासणीला पाठवले आहेत. त्यांच्यासह इतर संशयितांचे अहवाल मिळून एकूण ११८ रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने १४ संशयित नाशिक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांचे स्वब घेऊन लवकरच तपासणीला पाठविण्यात येतील. याबाबतची माहिती सिव्हील सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये आतापर्यंत १५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये मालेगाव येथील एका रुग्णाचा कोरोना बाधित सिद्ध होण्याच्या आधीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण १४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात मालेगावमध्ये १० तर नाशिकमध्ये चार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नाशिकमध्ये आतापर्यंत एकूण १ हजार ६२ रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. तर गृहस्थानबद्ध एकूण ३२३ जणांना करण्यात आले आहे. संस्थात्मक स्थानबद्ध करण्यात आलेल्यांची संख्या ११४ इतकी आहे. नाशिकमधील तपोवनात एकूण २७ रुग्ण संस्थात्मक स्थानबद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये २४ रुग्ण हे निजामुद्दीन मरकज येथे जाऊन आलेले आहेत.

आतापर्यंत एकूण ४४२ संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले आहेत. यात ३०७ निगेटिव्ह आले आहेत. तर निफाड तालुक्यातील कोरोना सिद्ध झालेल्या रुग्णाचे तिसऱ्यांदा नमुने घेण्यात आले असून ते पुण्याला तपासणीसाठी पाठविले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत १५२ संशयितांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात ५३, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ३९, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात ५९, अपोलो रुग्णालयात १ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.