Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

घोटी केंद्रातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Share
घोटी केंद्रातील ७ पोलीस कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव, nashik-news-cm-udhhav-thackeray-salute-ghoti-seven-police-countable

घोटी | प्रतिनिधी 

जीवाची पर्वा न करता कर्तव्यासोबत मानवधर्माचे काम करून 13 जणांचा प्राण वाचवणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सॅल्युट केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्याच्या घोटी केंद्रातील 7 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले.

मुंबई येथे राज्याचा पोलीस परिवहन विभाग, मुंबई वाहतूक पोलीस  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात चोख कर्तव्य बजावून नागरिकांचा जीव वाचवणाऱ्या 7 पोलीसांना मुख्यमंत्र्यांनी सॅल्युट केला.

2 महिन्यांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर एका टेम्पो ट्रँव्हलर वाहनाने अल्प प्रमाणात पेट घेतला होता. या वाहनातून अचानक धुर येवू लागल्याची घटना घोटी केंद्रातील महामार्ग पोलिसांच्या ध्यानात आली. महामार्ग पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सदाशिव वालझाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय केशव हिरे, पोलीस हवालदार संजय काशीनाथ क्षीरसागर, पोलीस नाईक योगेश दादाजी पाटील, जितेंद्र सदाशिव पाटोळे, पोलीस शिपाई केतन शिवाजी कापसे, विक्रम शिवाजी लगड ह्या 7 जणांनी तातडीने समयसूचकता दाखवली.

कोणत्याही क्षणी वाहनातील नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका या सर्वांनी ओळखला. कर्तव्य धर्मासोबत मानवधर्माचा विचार करून 7 जणांनी तातडीने जळणाऱ्या वाहनात बसलेल्या 13 नागरिकांना मागील दरवाजाने सुरक्षित बाहेर काढले.

सर्वांना सुरक्षित स्थळी नेऊन आपले पुढील कर्तव्य पार पाडले. जळणाऱ्या वाहनात 3 बालके आणि इतर महिला व पुरुष होते. या प्रवाशांना बाहेर काढतांना त्या वाहनाने पेट घेतला. मात्र 7 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समयसूचकता, मानवधर्म आणि कर्तव्यधर्मामुळे संभाव्य जीवित हानी टळली.

या घटनेत प्राण वाचलेल्या 13 जणांचा जीव वाचल्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. ह्या पार्श्वभूमीवर घोटी केंद्रातील महामार्ग पोलीस पथकातील 7 पोलिसांच्या विशेष कार्याची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली. त्यानुसार मुंबई येथे संपन्न झालेल्या 31 व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सात पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या नागरिकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध होऊन जीवाची बाजी लावणाऱ्या 7 पोलीस कर्मचाऱ्यांना सॅल्युट करतो असे गौरवास्पद उदगार काढले.

यावेळी व्यासपीठावर परिवहन व संसदीय कामकाज मंत्री ना. अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर, प्रधान सचिव आशीषकुमार सिंह, अप्पर पोलीस महासंचालक ( वाहतूक ) विनय कोरेगावकर, पोलीस सहआयुक्त मधुकर पांडे, परिवहन आयुक्त शेखर चन्ने आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!